गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने कारवाई करण्यास गेलेल्या महसूल विभागातील पथकातील अधिकाऱ्यांच्या अंगावर थेट ट्रॅक्टर चालविला. यात ग्रामसेवक किरण मोरे यांच्या पायावरून चाक गेल्याने हाड मोडल्याची घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी पवनी तालुक्यातील खातखेडा रेती घाटावरहा जीवघेणा प्रकार घडला. या प्रकरणी आशिष काटेखाये (३५),पंकज काटेखाये (३३) व एक अनोळखी व्यक्ती अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवनी तालुक्यातील खातखेडा येथील नदी घाटावरून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यावरून नायब तहसीलदार मयूर चौधरी, तलाठी बहुरे व ग्रामसेवक किरण मोरे शुक्रवारी सायंकाळी रेती घाटावर पोहचले होते. दरम्यान नदी घाटातून विना नंबरचा ट्रॅक्टर बाहेर येताना दिसताच चालकाला थांबवून टॉर्चच्या उजेडात झाडाझडती घेण्यात आली. ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती दिसल्याने रॉयल्टी संदर्भात विचारणा केली असता रायल्टी नसल्याचे चालकाने सांगितले.
ट्रॅक्टरच्या जप्तीची कारवाई सुरू करताच चालकाने मालकाला मोबाईलवरून कळविले. दुचाकीने मालक व एक अनोळखी व्यक्ती घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी, तुम्ही माझाच ट्रॅक्टर वारंवार कसा चालान करता? तुमचा बंदोबस्त लावतो, असे म्हणून चालक आशिष काटेखाये, पंकज काटेखाये व सोबतच्या अनोळखी व्यक्तींने ग्रामसेवक किरण मोरे यांच्या अंगावर रेतीचा ट्रॅक्टर चालविला. यात त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडून गंभीर जखमी झाले. या प्रकारानंतर घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला.
घटनेची माहिती होताच महसूल विभागाच्या भरारी पथकाने धाव घेऊन जखमी ग्रामसेवकाला पवनीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. पायाचे हात मोडल्याचे लक्षात आल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आले. या प्रकरणी पवनी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७,३५३, ३३३, ३७९, ४०६, १०९ व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.