भंडारा : तीन महिन्यांपासून नगरपंचायतीची मासिक सभा न झाल्याने संतापलेल्या १२ नगरसेवकांनी चक्क अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या खुर्चीलाच हार टाकत श्रद्धांजली अर्पण करून संताप व्यक्त केला.
मोहाडी येथील नगरपंचायत नेहमी कुठल्या न कुठल्या कारणावरून सदैव चर्चेत असते. आता गत तीन महिन्यांपासून अध्यक्षांनी मासिक सभा न घेतल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी चक्क अध्यक्षा छाया डेकाटे आणि उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्या खुर्चीला हार घालत शोकसभा घेत श्रद्धांजली अर्पण केली. तीन महिन्यांपासून अध्यक्ष, उपाध्यक्ष सभा घेण्यास टाळाटाळ करीत मोहाडी शहरातील अनेक कामे प्रलंबित असून, विकास थांबला आहे. यावर कुठलाच निर्णय अध्यक्ष व उपाध्यक्ष घेत नसल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले. यात अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून श्रद्धांजली व्यक्त केल्याने शहरात हा विषय चर्चेचा ठरला आहे.
१७ सदस्यीय नगरपंचायतीतील काँग्रेस गटनेता महेश निमजे, भाजप गटनेता यादोराव कुंभारे, पाणीपुरवठा सभापती देवश्री शहारे, बालकल्याण सभापती सुमन मेहर, माजी उपाध्यक्ष शैलेश गभने, नगरसेवक हेमराज पराते, पवन चव्हाण, लाला तरारे, नगरसेविका अश्विनी डेकाटे, पूनम धकाते, मनीषा गायधने, रेखा हेडावू या सर्वपक्षीय १२ नगरसेवकांनी अध्यक्ष, उपाध्यक्षाविरोधात बंड पुकारला असल्याने पुन्हा एकवेळ मोहाडी नगरपंचायतीच्या सत्तेत उलटफेर होण्याचे हे संकेत तर नाही ना! अशीही चर्चा रंगली आहे.
अध्यक्षांनी तीन महिन्यांपासून सभा घेतली नाही, दोन वेळा मासिक सभा बोलावून रद्द केली. त्यामुळे विकासाची कामे रखडली आहेत. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची मानसिकता नसल्यानेच मासिक सभा घेतली जात नाही. त्यामुळे त्या खुर्चीला श्रद्धांजली अर्पण केली.
- महेश निमजे, गटनेता काँग्रेस पक्ष.