लाखांदूर (भंडारा) : घरासमोरील नळाच्या टाक्यात पडून एका दोन वर्षीय बालिकेचा करुण अंत झाला. ही घटना शनिवारी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथे घडली. त्रिषा अरविंद मिसार असे घटनेतील मृत बालिकेचे नाव आहे.
अरविंद मिसार यांचे मांढळ येथे राहते घर आहे. ते राहत असलेल्या परिसरात नळ योजनेचे पाणी पोहोचत नसल्याने त्यांनी जमिनीत टाके तयार केले आहे. हा टाके सिमेंट काँक्रिटचे असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्यादेखील आहेत. शनिवारी सायंकाळच्या सुमारास त्रिशा ही घरासमोरील अंगणात खेळत होती. खेळता खेळता ती जवळपास ३ फूट पाणी असलेल्या नळाच्या टाक्यात कोसळली. ही घटना परिसरातील नागरिकांसह कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्रिशाला पाण्याबाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
घटनेची माहिती होताच लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे, पोलिस हवालदार गोपाल कोसरे, पोलिस अंमलदार नीलेश चव्हाण, वाहनचालक भूपेश बावणकुळे, विनोद मैंद यांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून या घटनेचा तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
सदोष पाणीपुरवठा योजना
मांढळ येथे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नळ कनेक्शन देण्यात आले आहेत; मात्र अरविंद मिसार राहत असलेल्या भागात नागरिकांच्या नळाला पाणीच येत नसल्याची ओरड आहे. निदान पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी नागरिकांनी घरासमोरील अंगणात सिमेंट काँक्रिटचा खोल खड्डा तयार केला आहे. परिसरातील नागरिक या खड्ड्यातूनच नियमित पाणी भरत असल्याचे सांगण्यात येते. मात्र सदोष पाणीपुरवठा योजनेने बालिकेचा जीव घेतल्याची ओरड संपूर्ण मांढळवासी करीत आहेत.