मोहाडी (भंडारा) : कोळसा वाहून नेत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला उभी असलेली महिला ट्रक खाली आली. उपस्थितांचा थरकाप उडाला. महिलेच्या अंगावरून जाऊन ट्रक रस्त्याच्या खाली उतरला. नागरिकांनी धाव घेतली. पाहतात तर काय, दैव बलवत्तर म्हणून महिला चमत्कारिकरीत्या बचावली. मात्र, तिच्या एका हातावरून चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सकाळी ७.१५ वाजता येथील कुशारी फाटा चौका घडली. प्राणावर आली होती, पण हातावर निभावली, असे म्हणण्याची वेळ आली.
अर्चना अनिल चिंधोलोरे (३५, रा. मोहाडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. घरातील केरकचरा उकिरड्यावर टाकण्यासाठी ती कुशारी फाटा चौकातील रस्ता सोमवार सकाळी पार करीत होती. त्याच वेळी तिरोडाकडे कोळसा घेऊन जाणार ट्रक (क्रं. एमएच ४० - एके ७६५७) अनियंत्रित झाला. रस्त्याच्या कडेला असलेले छोटे सती मंदिर व नाग मंदिर भुईसपाट करीत तो ट्रक अर्चनाच्या अंगावरून गेला अन् पाहणाऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला.
महिलेचे बरेवाईट झाले असावे, असे म्हणत अनेकांनी धाव घेतली. दुर्दैवाने महिला ट्रकच्या चारही चाकाच्या मधोमध पडलेली होती. तर एक हात चाकाखाली दबाला होता. अपघातग्रस्त ट्रक मागे घेऊन अर्चनाला सुखरूप बाहेर काढले. तिच्या एका हाताला गंभीर दुखापत झालेली दिसून आली. तत्काळ मोहाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून नंतर भंडारा रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. कोळशाने भरलेला ट्रक अंगावरून जावून अर्चना चमत्कारिकरीत्या बचावली. दैव बलवत्तर म्हणून हातावर निभावली. दिवसभर मोहाडी शहरात या अपघाताची चर्चा होती.