मुखरु बागडे
भंडारा : शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करीत नवनवे प्रयोग साकारले जात आहेत. मत्स्य शेती हा एक शेती उत्पन्नाचा एक भाग असून तरुणाईने लक्ष केंद्रित केल्यास वर्षाला लाखो रुपये कमविता येतात. सकारात्मक विचार, काल्पनिक जोड, प्रयत्नांची पराकाष्टा व जिद्द सांभाळल्यास अशक्य ते शक्य होतेच! असाच एक सकारात्मक प्रयोग मत्स्यशेतीतून पुढे आला. लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील उच्चशिक्षित तरुण अभय भुते यांनी मत्स्यशेती करीत वर्षाला सुमारे ५ ते ६ लक्ष रुपयांचे उत्पन्न घेत युवा पिढीला नवा आदर्श दिला.
अभय वसंता भुते हा अठ्ठावीस वर्षीय तरुण बारावीचे विज्ञान शाखेत शिक्षण घेत डीएड व संगणक क्षेत्रात पदविका शिक्षण पूर्ण करून केंद्र शासनाच्या आयसीटी प्रकल्पात संगणक शिक्षक म्हणून कंत्राटी पद्धतीने एका विद्यालयात कामावर होता, परंतु कंत्राट संपल्यावर आता काय करावे, यात गुंतून न जाता घरी वडिलोपार्जित असलेल्या शेतीमध्ये काही नवीन बदल करावे. या उद्देशातून मत्स्य पालन व्यवसायाकडे वळला. यासाठी विविध संस्थांकडून प्रशिक्षण घेतले व शेतावर शेत तलावाची निर्मिती केली. त्यात देशी मागूर व सिंगूर या जातीचे मत्स्य बीज टाकून त्यांचे संगोपन केले.
या माशांचे पालन आपल्या परिसरात कुठेही होत नसल्याने मत्स्य विज्ञानमध्ये शिक्षण घेतलेल्या प्राध्यापक विनय चाचेरे यांची मदत घेतली. मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला. माशांची वाढ सुद्धा अपेक्षित परंतु मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे माशांना अपेक्षित विक्री न मिळाल्याने नुकसान झाले. मात्र यात जिद्द न सोडता पुन्हा या वर्षी देसी मगूर,सिंगूर रोहू, कटला, सिफनस माशांचे मत्स्य बीज टाकून संगोपन सुरू आहे.
जैविक पद्धतीने मत्स्य शेती!
देशी जातीचे मासे असल्याने त्यांना लागणारे खाद्य हे देखील नैसर्गिक असायला हवे. यासाठी कुजलेले शेणखत, गूळ, डी कंपोजर, शेतावरच पिकवलेल्या मक्याचा चुरा अशा कमी खर्चात संगोपनासाठी लागणारे खाद्य तयार करून मत्स्य पालन करत आहेत.
अभय भुते व कुटुंबीयांनी सुरू केलेला व्यवसाय बेरोजगार तरुणांना प्रेरणा देणारा आहे. आपल्या शेतावर नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करीत आहे.धान पिकाला पर्याय शोधत इतर शेतीपूरक व्यवसाय केल्यास याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
किशोर पात्रीकर, तालुका कृषी अधिकारी, लाखनी