भंडारा : गावाशेजारील दगडी खदानीत मासोळ्या पकडायला गेलेल्या तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. तो मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होता.
संजय गोपीचंद इळपाते (४०) रा. पालोरा असे मृताचे नाव आहे. तो मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घरून बाहेर गेला होता. पत्नीने विचारणा केली असता त्यावेळी त्याने काहीही सांगितले नव्हते. मात्र, रात्री घरी न आल्याने पत्नीने शेजाऱ्यांकडे विचारपूस केली. परंतु, कुठेही त्याची माहिती मिळाली नाही. बुधवारी सकाळी घराशेजारील दगडी खदान काठावर चप्पल, मासोळ्या पकडण्याचे जाळे व कपडे ग्रामस्थांना दिसून आले. कुणीतरी आत्महत्या तर केली असावी, अशी शंका व्यक्त करण्यात आली. करडीचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. ग्रामस्थांच्या मदतीने १५ फूट खोल खदानीत शोधमोहीम राबविण्यात आली. सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याचे मृतदेह मिळाला.
पत्नीचे तक्रारीवरून करडी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. मासोळ्या पकडण्याच्या नादातच खदानीच्या पाण्यात बुडाला असावा, असा अंदाज आहे. त्याच्या मागे पत्नी, मुलगा व बराच आप्त परिवार आहे.