भंडारा : मोहफुले संकलनासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या एका तरुणाला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. वाघाने तरुणाला २०० मीटर ओढत नेत त्याचा एक पाय फस्त केला. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
जयपाल घोगलू कुंभरे (४०), रा. इंदोरा, ता. लाखांदूर असे मृताचे नाव आहे. मंगळवारी सकाळी तो इंदोरा-अरुणनगर मार्गावरील जंगलात मोहफुले संकलनासाठी सायकलने गेला होता. जंगलातील एका झाडाखाली मोहफुले गोळा करीत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या एका वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला. २०० मीटर ओढत नेत त्याचा उजवा पाय फस्त केला. सकाळी गेलेला जयपाल दुपारपर्यंत परत आला नाही म्हणून कुटुंबाने त्याचा शोध सुरू केला तेव्हा दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती लाखांदूर वनविभागासह पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी वाघाचे पगमार्क आढळून आल्याने त्याला वाघानेच ठार केल्याचे वनविभागाने सांगितले.
घटनास्थळाला लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश गावित यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम व पथकाने भेट दिली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
लाखांदूर तालुक्यातील दुसरी घटना
वाघाच्या हल्ल्यात बळी जाण्याची ही दुसरी घटना होय. फेब्रुवारी महिन्यात दहेगाव जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या एका ५४ वर्षीय इसमावर वाघाने हल्ला करून ठार केले होते. मंगळवारी तरुणाला वाघाने ठार केले. यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.