लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : टेलरकडून कापड घेऊन मैत्रिणीसोबत स्कूटीने घरी परतणाऱ्या एका २५ वर्षीय युवतीचे देव्हाडी येथील रेल्वे फाटकावरून तीन युवकांनी सिनेस्टाइल अपहरण केले. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी ११:३० च्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. मात्र, शोध लागला नाही.
देव्हाडी येथील गांधी वॉर्डात राहणाऱ्या संबंधित तरुणीच्या पालकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ही अपहृत तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत स्कूटीने देव्हाडी येथील टेलरकडे शिवलेले कापड आणण्याकरिता गेली होती. कापड घेऊन घरी परत येताना रेल्वे फाटकावर थांबली. दरम्यान, प्रशांतचंद राजपूत ऊर्फ मकालू (२५, गांधी वॉर्ड देव्हाडी) व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी तरुणीला बळजबरीने उचलून चारचाकी वाहनात कोंबले आणि पलायन केले. पोलिसांनी या तक्रारीवरून तातडीने तपासाची चक्रे फिरविली. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून वायरलेसवरून सर्वत्र माहिती देऊन जिल्ह्यातील सर्व महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. सायंकाळपर्यंत ती नकाबंदी सुरू होती. मात्र, तपास लागला नाही. दरम्यान, जिल्हा पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देव्हाडी येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी तुमसर पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम ८७, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"देव्हाडी येथील घडलेली घटना ही प्रेमप्रसंगातून घडली असे तिच्या मैत्रिणीचे बयाण आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. तपासासाठी पथक रवाना केले जात आहे. लवकरच शोध घेतला जाईल." - ईश्वर कातखेडे, जिल्हा पोलिस उपअधीक्षक, भंडारा