लाखनी (भंडारा) : विदर्भात उष्णतेची लाट आल्यामुळे पारा ४६ अंशापर्यंत पोहोचला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून उष्माघाताने लाखनी तालुक्यातील मुरमाडी सावरी येथील एक युवकाचा मृत्यू झाला. आचल चिंतामण गजभिये असे मृत तरुणाचे नाव आहे.
कडक उन्हामुळे दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य होत आहेत. तरीही उकाड्यामुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुरमाडी/सावरी येथे १५ मे रोजी आचल याला ताप आला. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेण्यात आले. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याच्यावर औषधोपचार केल्याने बरे वाटल्यामुळे तो घरी गेला. पण काही वेळानंतर त्याला पुन्हा ताप चढला. नातेवाईकांनी पुन्हा ग्रामीण रुग्णालयात आणले. पण प्रकृती गंभीर झाल्याने प्रथमोपचार केल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याचा नातेवाईकांना सल्ला दिला. पण उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
आचल गजभिये याला अत्यवस्थ स्थितीत रविवारी मध्यरात्री १२:१० वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तपासणी केली असता, त्याला १०८ अंश सेल्सिअस ताप होता आणि तो झटके मारत होता. अति उष्णतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण व शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचाराची सोय नसल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले होते.
- डॉ. अमित मेश्राम, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय लाखनी