भंडारा : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या खासगी वादातून २१ वर्षांच्या युवकाला भर रस्त्यात चाकूने पोटात भोसकून आणि दगडविटांचे घाव घालून ठार केल्याची घटना भंडारा शहराचा भाग असलेल्या गणेशपूर रोडवरील जिल्हा परिषदेच्या मागे घडली. अभिषेक कटकवार असे मृताचे नाव असून, तो शहरातील टप्पा मोहल्ला (मूळचा मेंढा पोहरा, ता. लाखनी) येथे राहणारा आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे.
रात्री सुमारे ११:३० वाजताच्या दरम्यान अभिषेक हा त्याचा लहान भाऊ अरमान (१९) आणि अन्य तिघेजण गणेशपुरात राहणाऱ्या त्याच्या सासूच्या घरून दुचाकीने येत असताना गणेशपूर रोडवरील एका टोळक्याने त्यांना गाठले. बाईकचा पाठलाग करून महामार्गाकडे जाणाऱ्या रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटसमोरच अडवून अभिषेकवर घाव घातले. यात तो रक्तबंबाळ होऊन पडला. या घटनेनंतर अरमानने त्याला सोबत्यांच्या मदतीने उचलून बाईकवरून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांना ही घटना कळताच त्यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन आरोपींची धरपकड सुरू केली. पहाटेपर्यंत तीन आणि दिवसभरात दोन अशा पाच जणांना अटक केली. यात मुख्य आरोपी चिराग नमोद गजभीये (२७, रमाबाई आंबेडकर वॉर्ड) याच्यासह पराग परसराम सुखदेवे (४७, शिक्षक कॉलनी), लुकेश ऊर्फ लुक्का संजय जोध (२५, आंबेडकर वॉर्ड), शाम सुखराम उके (३४) आणि सागर देवानंद भुरे (२५, दोन्ही रमाबाई आंबेडकर वॉर्ड) या पाच जणांचा समावेश आहे. या सर्वांवर कलम ३०२, १४३, १४६, १४७, १४८, १४९, २९४ भादंवि नुसार गुन्हे नोंदविले असून त्यांची २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळविण्यात आली आहे. तर, मोन्या ऊर्फ मोनार शेंडे आणि तेजस सुनील घोडीचोर या दोघांचा शोध सुरू आहे. सकाळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रक्ताने माखलेली पेवर विट, एक तलवार, चाकू व अन्य वस्तू जप्त केल्या.
सासू व पत्नीला केले होते मेसेज
चिराग गजभिये याने काही दिवसांपूर्वी अभिषेकच्या सासूला आणि पत्नीला मोबाईलवरून मेसेज केले होते. त्यामुळे अभिषेकने हटकले असता त्यांच्यात पाहून घेण्यापर्यंत वाद झाला होता. घटनेच्या रात्री अभिषेक या मार्गावरून येत असल्याचे पाहून चिरागने सोबत्यांच्या मदतीने त्याचा गेम केला.
आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारीची
यातील चिराग वगळता बहुतेक सर्व आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. पराग हा २० वर्षांपूर्वीचा एमपीडीएतील आरोपी आहे, तर अभिषेकवरही लाखनी पोलिसात एक गुन्हा दाखल आहे.
अरमानने पाय पकडून केली होती विनवणी
चिराग आणि त्याचे साथीदार भावावर प्राणघातक हल्ला करीत असताना लहान भाऊ अरमानने आरोपींचे पाय पकडून अभिषेकला जीवे मारू नका, अशी विनवणी केली होती. मात्र सैतान डोक्यात संचारलेल्यांनी अभिषेकला संपविले. पंचनाम्यासाठी पोलिस आले तेव्हा अरमान हे सर्वांना मोठ्याने सांगत होता.