मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : पडीत शेतात आवळ्याची झाडे लावली. आवळ्यापासून वेगवेगळे १० पदार्थ तयार केले. त्या उत्पादनातून महिन्याकाठी एक ते दीड लाखापर्यंतचा शुद्ध नफा कमवून शेतीला जोडधंदा सुरू केला. ही किमया साकारली आहे, विनोबा नगरातील वाहाने दाम्पत्यांनी.तुमसर शहराच्या उत्तरेला लागून असलेल्या पिपरा या ठिकाणी वाहाने यांची १५ एकर पडित शेतजमीन आहे. या जमिनीत हर्षना यांनी आवळ्याची शेती करण्याचे ठरविले. सन २००७ यावर्षी रामटेक येथील हिवरा नर्सरीतून नरेंद्र आवळा व आनंद प्रजातीचे रोप लावले. त्यानंतर आवळ्याला थोक बाजारात दर नसल्यामुळे त्यापासून विविध पदार्थ तयार करण्याचे त्यांनी ठरविले. हर्षना यांचे पती दुर्गाप्रसाद हे गोंदिया येथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते.पत्नीच्या जिद्दीला पाठबळ देऊन त्यांनी धनाबल नामक शेतातच छोटे फर्म तयार केले. पत्नीला राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात फळे व पालेभाज्या यावर प्रक्रियाबाबत प्रशिक्षणासाठी पाठविले. त्यानंतर कुटीर उद्योग विभागातून आर्थिक प्रक्रियाबाबत प्रशिक्षणासाठी पाठविले.त्यानंतर हर्षना यांनी स्वत:च्या फर्ममधून आवळ्यापासून १० प्रकारचे पदार्थ तयार करून बाजारपेठेत पाठविले आहे. वाहाने यांच्या फर्ममार्फत बाजारपेठेत आवळ्याचे लाडू, लोणचे, मुरब्बा, स्वीट कॅन्डी, मसाला कॅन्डी, पावडर, पाचक सुपारी, आवळा रस, मुखशुद्धी व शरबत अशी दहा उत्पादने तयार केली. आता ही उत्पादने विक्रीकरिता पाठविली जात आहेत. आवळ्याचे आरोग्यदायी लाभ व त्याचे गुणधर्म यांचा अभ्यास करून हर्षना यांनी उत्पादनांना विदर्भ, महाराष्ट्र व मध्यप्रदेशात पाठविले.व्यवसाय शहरातूनच नाही तर ग्रामीण भागातूनही करता येतो, हे वाहाने दाम्पत्यांनी दाखवून दिले आहे. उत्पादनाच्या वाढत्या मागणी व पत्नीच्या कामात हातभार म्हणून कृषी अधिकारी या पदाचा त्यांनी त्याग केला. पत्नीला सहकार्य करण्याकरिता सेवानिवृत्ती घेऊन दुर्गाप्रसाद यांनी समाजापुढे आदर्श उदाहरण निर्माण केले. उत्पादन तयार करण्याच्या प्रथम टप्प्यापासून ते विक्रीकरिता पाठविण्यापर्यंत दुर्गाप्रसाद यांनी पत्नीला पाठबळ दिले.या पदार्थाकरिता लागवडीतून अपुरा पडणाऱ्या आवळ्याची पुर्तता मध्यप्रदेशातील डोंगरगडहून केली जात असल्याचे वाहाने यांनी सांगितले. सर्व खर्च वजा जाता आवळा शेतीतून वाहने दाम्पत्याला दरवर्षी २० ते २५ लाख रूपयांचा नफा होत आहे. वाहने यांना दोन मुली असून त्यांनी तयार केलेल्या आवळ्याच्या प्रत्येक पदार्थाचे नाव मुलींच्या नावातील शब्दांना जोडून तयार केले असल्याचे वाहने दाम्पत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बेरोजगार तरूणांनी यातून आदर्श घेऊन शेतीला जोडधंदा निर्माण करण्याचा मुलमंत्र दिला आहे.
पडीत शेतीतून आवळा व्यवसायाची किमया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:37 PM
पडीत शेतात आवळ्याची झाडे लावली. आवळ्यापासून वेगवेगळे १० पदार्थ तयार केले. त्या उत्पादनातून महिन्याकाठी एक ते दीड लाखापर्यंतचा शुद्ध नफा कमवून शेतीला जोडधंदा सुरू केला.
ठळक मुद्देलोकमत प्रेरणावाट : वर्षाकाठी २० ते २५ लाख रूपयांची उलाढाल