यावर्षी त्यांच्या शेतात कोहळा, कारले, भेंडी, वांगे, मिरची, टमाटर, फुलकोबी, पानकोबी आदींची लागवड केली आहे. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. कृषीशास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि अनुभवातून ते शेती करीत आहेत. मोहाडी तालुक्यातील डोंगरदेव शिवारात असलेल्या शेतीत एक एकर क्षेत्रात मिरची आहे. ७५ दिवसानंतर मिरचीचा पहिला तोडा निघाला. तेव्हा तो १६७५ किलो एवढा निघाला. ३० रुपये किलो प्रमाणे बाजारात भावही मिळाला आहे. पुढचा तोडा १३ दिवसानंतर निघणार आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन केल्यास शेती फायद्याची ठरू शकते असे ते सांगतात.
बॉक्स
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरले बंडू बारापात्रे
बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांची डोंगरदेव शिवारात ३५ एकर शेती आहे. संपूर्ण बागायती असलेली ही शेती कृषी विभागातील अधिकाऱ्यांसोबतच शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक आहे. बी-बियाणे, पाण्याचे नियोजन, आंतरमशागत, खर्च आणि उत्पन्नाचा हिशेब आदींचे योग्य नियोजन केले जाते. त्यांची शेती पाहून मार्गदर्शन घेण्यासाठी येथे शेतकरी येतात. विषमुक्त भाजीपाला तयार करुन निर्यातक्षम उत्पादन घेत आहेत.
कोट
शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे. हा समज खोटा ठरविण्यासाठी आपण शेती करीत आहोत. योग्य नियोजन आणि कृषी शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार लागवड केली जाते. शेतकऱ्यांनी परंपरागत पिकांसोबत नगदी पिकांकडे वळणे आवश्यक आहे. उच्च दर्जाचा भाजीपाला पिकविला तर बाजारात योग्य भाग निश्चितच मिळतो.
-बंडू बारापात्रे, शेतकरी