भंडारा : शहरात तशा अनेक जुन्या इमारती आहेत. त्यापैकीच इंग्रजकालीन वास्तू व आता बुरुजरूपात शिल्लक असलेल्या बसस्थानकाजवळील दशकभरापूर्वी बांधण्यात आलेल्या पालिकेच्या गाळे बांधकामात तब्बल चार काेटींचा चुराडा करण्यात आला हाेता. सद्य:स्थितीत या गाळ्यांचा कुठलाही उपयाेग नसून हे गाळे फक्त शाेभेची वास्तू ठरले आहे.
अभियंता व कंत्राटदाराचे पाेट भरण्यासाठी हा सर्व खटाटाेप करण्यात आल्याचेही आता समाेर येत आहे. विशेष म्हणजे माेक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेत उत्तर-पश्चिम बाजूला अनेक दुकानदार आजही पडक्या गाळ्यांमध्ये दुकान चालवीत आहेत. जीव धाेक्यात असतानाही नगरपालिका प्रशासन फक्त दाेन हजार रुपये मासिक भाडे घेण्यातच धन्यता मानत आहे.
ऐतिहासिक व इंग्रजकालीन दर्जा लाभलेल्या पूर्वीच्या या बुरुजातून इंग्रज चुंगीनाका चालवीत असायचे. येथूनच भंडारात प्रवेश दिला जायचा. कालांतराने हा चुंगीनाका बंद पडला. त्यानंतर दशकभरापूर्वी समाेरचा भाग वगळता बुरुजाच्या आतील भागात दाेन्ही बाजूला गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. अनेकांनी मलिदा लाटून हात वर केले.
तेव्हा या बांधकामासाठी तब्बल चार काेटींचा निधी पालिका प्रशासनाने खर्च केला हाेता. या गाळ्यांची अत्यंत दुरवस्था हाेत असून अनेक ठिकाणी शेवाळ उगविली आहे. सांडपाणी साचले असून डासांचे आश्रयस्थान बनले आहे. यासंदर्भात अनेक स्थानिक लाेकनेत्यांनीही या समस्येला वाचा फाेडू यासाठी या ठिकाणी भेट देत माेठमाेठी आश्वासनेही दिली. मात्र पाणी गाळ्यांमध्ये मुरत राहिले. ‘आपलेच ओठ आणि आपलेच दात’ अशी स्थिती असल्याने कारवाईचा बडगा उगारायचा तरी कसा, असा प्रश्न उपस्थित झाला. परिणामी कुणावरही ना कारवाई झाली ना गाळ्यांचे निट व्यवस्थापन झाले. मध्यंतरी या गाळ्यांमध्ये कांजी हाऊस स्थापन करण्यात आले हाेते. चार काेटींचा निधी जनावरे ठेवण्यासाठी झाला काय, असा उपराेधिक सवालच शहरवासीयांनी व्यक्त केल्यानंतर तेथून कांजी हाऊस हलविण्यात आले. तेव्हापासून ती वास्तू अडगळीत आहे.
‘त्या’ गाळा मालकांकडे दुर्लक्ष
जिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साईराज ऑटाेमाेबाइलसमाेर असलेल्या या पालिकेच्या गाळ्यांची अवस्थाही अत्यंत बिकट आहे. येथे चार ते पाच वेळा काही गाळ्यांचे स्लॅब काेसळल्याने अनेक जण थाेडक्यात बचावले आहेत. पण पालिका प्रशासन दरमहा दाेन हजार रुपये भाडे वसूल करण्यातच धन्यता मानत आहे. गाळा मालकांच्या समस्यांकडे अक्षरश: दुर्लक्ष करण्यात आले आहे. एखादी अप्रिय घटना घडल्यावर पालिका प्रशासन जागणार काय, असा सवालही उपस्थित हाेत आहे. उल्लेखनीय म्हणजे या गाळ्यांच्या मागे बांधकाम हाेत असताना या भाडेकरू गाळे मालकांनी गाळे विस्तारित करून मागील भागापर्यंत जागा देत बांधकाम करून द्यावे, अशी रास्त मागणीही केली हाेती. मात्र तत्कालीन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी अंदाजपत्रकाची व नियाेजनाची बाब समाेर आणत नकार दिला हाेता.