पालांदूर : कोरोनाचे संकट गडद असल्याने बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. शनिवार, रविवारच्या दिवशी बाजारपेठा प्रभावित झालेल्या आहेत. त्यामुळे भाजीपाल्याला अपेक्षित मागणी नसल्याने भाजीपाल्याचे भाव जमिनीवर आले आहेत. भेंडी पाच रुपये किलोने विकता विकेना झाली आहे. ग्राहकही दराविषयी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. शेतकरी मात्र तुटला आहे.
चूलबंद खोऱ्यात सदाबहार भाज्यांचे मळे आहेत. शेतकरी हायटेक होत आहे. तंतोतंत शेती करीत उत्पन्न वाढवित आहे. उत्पन्नाबरोबर खर्चसुद्धा वाढलेला आहे. परंतु कोरोनाच्या संकटाने बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाल्याला मागणी घटलेली आहे.
पालांदूर चूलबंद खोऱ्यात सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शनिवारी अगदी सकाळपासूनच बाजारपेठ फुललेली असते. शेजारील जिल्ह्यातील व्यापारी पालांदूर येथील बाजारपेठेत हजेरी लावतो. भाजीपाल्यासोबतच इतरही वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ असते. परंतु शनिवार दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पालांदूरची बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कायम आहे.
कृषी विभागाच्या व बीटीबी सब्जी मंडीच्या प्रेरणेने बागायतदार प्रगतशील भाजीपाल्याची शेती करत आहेत. भर पावसाळ्यातही शेतकऱ्यांचे मळे ताजेतवाने आहेत. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सुमारे २०० हेक्टरवर भाजीपाल्याची शेती नियोजित आहे. यात पालांदूर येथे सुमारे ३० हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड आहे. पालांदूर, मऱ्हेगाव, पाथरी, नरव्हा, वाकल, ढिवरखेडा, आदी गावात भाजीपाल्याची शेती बारमाही पिकविली जाते. पावसाने उसंत घेतली असून मोजकाच पाऊस पडत असल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात भरीव वाढ आहे. उत्पादित मालाला बाहेर अपेक्षित निर्यात नसल्याने भाव पडलेले आहेत. शेतकऱ्याचा खर्चही निघणे कठीण आहे.
चवडी, भेंडी, वांगे, काकडी, दोडका, लवकी आदी भाजीपाल्याची पिके मोठ्या प्रमाणात लावलेली आहेत.
अर्धा एकर जागेत भेंडीची लागवड केलेली आहे. आणखीही भाजीपाल्याची पिके लावलेली आहेत. दररोजची भेंडी तोडली जाते. परंतु, दर पाच रुपये किलो असूनही विकत नसल्याने समस्या उभी झाली आहे.
कोट
मजुरीचे दर, कीटकनाशक, खते यांचे नियोजन आवाक्याबाहेर होत आहे. शनिवारचा आठवडी बाजार बंद असल्याने व दर अत्यल्प असल्याने भाजीपाला काढणीसुद्धा परवडत नाही.
नीतेश भुसारी, बागायतदार, पालांदूर.
वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न अधिक वाढलेले आहे. जिल्ह्यात शेतकरी भाजीपाल्याकडे वळलेला आहे. बाहेर जिल्ह्यात निर्यात कमी झाल्याने भाव अत्यल्प आहेत. दर्जेदार मालाला भाव बरे आहेत. ऑगस्ट महिन्यात भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे.
बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी भंडारा.