लाखांदूर (भंडारा) : प्रेमविवाहानंतर सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या गर्भधारणेवर संशय व्यक्त करीत छळ करून जबरदस्तीने गर्भपात केल्याची घटना घडली. ही घटना १० सप्टेंबर रोजी लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथे उघडकीस आली.
या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून दिघोरी मोठी पोलिसांनी पती निखिल विलास रंगारी (२७), सासरा विलास शंकर रंगारी (५५), सासू देवला विलास रंगारी (४८) हिच्यासह लीना रंगारी (३४), अक्षय खोब्रागडे (२२), मोहित शेंडे (२५), लक्ष्मण जांगळे (३८), अंकित रंगारी (३२) व साकोली येथील एक महिला व पुरुषाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी चिचाळ येथील निखिल रंगारी याने प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर पीडित विवाहिता गर्भवती राहिली. निखिलसह सासू, सासरे यांना भडकवत पीडितेची गर्भधारणा अन्य संबंधातून असल्याचा आरोप करीत पीडितेच्या विरोधात त्यांना भडकाविले.
अन्य जणांच्या ऐकण्यावरून पीडितेच्या पतीसह सासू-सासरे व अन्य आरोपींनी संगनमत करून साकोली येथील दोन अज्ञात व्यक्तींच्या मदतीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन जबरदस्तीने गर्भपात केला. तसेच मृत अर्भकाला जंगलात नेऊन दफनविधी केला असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. तक्रारीवरून पती, सासू, सासरे यासह अन्य सातजणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास दिघोरी मोठीचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार करीत आहेत.