लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकट डोक्यावर असताना त्यातच अस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. गुरुवार व शुक्रवार रात्री बरसलेल्या या पावसामुळे चौरास भागासह सातही तालुक्यातील धानपिकांसह रबी पिकाला मोठा फटका बसला आहे.शुक्रवारी रात्री १०.५० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. यात भंडारा, साकोली व पवनी तालुक्यात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे वाटाणा, हरभरा, उळीद, मुंग, लाख, लाखोरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारला गणतंत्र दिवस व रविवार सुटीचा दिवस असल्याने अवकाळी पावसामुळे नेमके किती नुकसान झाले याची इत्यंभूत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.तुमसर येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात अवकाळी पावसामुळे रबी पिकांसह धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाकाडोंगरी व आष्टी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे नाकाडोंगरी येथील धान केंद्र हाऊसफुल्ल झाले असून बारदाना उपलब्ध नाही. परिणामी केंद्रावरील धान उघड्यावर असल्याने ते पूर्णत: अवकाळी पावसात भिजले. शुक्रवार रात्रीही पाऊस बरसल्याने पोत्यातील धान मोठ्या प्रमाणात खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली. या धान खरेदी केंद्रात पाथरी, लोभी, आष्टी, बावनथडी, कवलेवाडा, हमेशा, घानोड, सक्करधरा, चिखला, धुटेरा, खंदाड, राजापूर, गुढरी, सीतासावंगी, पवनारखारी यासह शेतकऱ्यांनी या केंद्रावर धान विक्रीसाठी आणले होते. मात्र आता त्यांंना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. या दरम्यान शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही राजापूरचे माजी सरपंच वसंत बिटलाय यांनी दिला आहे.पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात बरसलेल्या पावसामुळे रबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लाख, लाखोरी, वटाणा, हरभरा, गहू, मुग पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे शेतकरी बोलून दाखवित आहेत.जिल्ह्यात शनिवारी सरासरी ३१.६ मि.मी. पाऊस बरसला. यात भंडारा ९७.२, पवनी १७०.५, साकोली ६६.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. याच तालुक्यामध्ये नुकसान जास्त झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
रबी पिकांचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 9:59 PM
जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकट डोक्यावर असताना त्यातच अस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. गुरुवार व शुक्रवार रात्री बरसलेल्या या पावसामुळे चौरास भागासह सातही तालुक्यातील धानपिकांसह रबी पिकाला मोठा फटका बसला आहे.
ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी आर्त हाक