भंडारा : न्यू-नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या चोरखमारा गेटवरून सफारीला गेलेल्या पर्यटकांना एका महिला जिप्सी वाहन चालकाने अपमानास्पद वागणूक दिली. गोंधळ घालत वाहनावर उभे होऊन त्या महिला जिप्सी चालकाने वादविवाद केला. वाहन आडवे लावले. गोंधळामुळे पाणवठ्यावरील दोन बिबट पळाले. ही घटना चाेरखमारा गेटजवळील पाणवठ्याजवळ शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी वनाधिकाऱ्यांना माहिती देत तक्रार नोंदविण्यात आली आहे.
भंडारा शहरातील डॉ. सुनील बोरकुटे सहकाऱ्यांसह शनिवारी चाेरखमारा गेटवरून जंगल सफारीला गेले होते. निसर्गभ्रमंती व वन्यजीवांच्या दर्शनाची अपेक्षा हाेती. चाेरखमारा गेटवरून पुढे गेले असता एका पाणवठ्याशेजारी दोन बिबट असल्याची माहिती मिळाली. जिप्सी चालकाने वाहन बाजूला लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जिप्सी चालक महिलेने आपली जिप्सी त्यांच्या जिप्सी समोर लावली. परिणामी डॉ. सुनील बाेरकुटे व त्यांच्या सहकाऱ्यांना बिबट पाहता येत नव्हते. त्यांनी त्या महिला चालकास वाहन बाजूला लावा, काहीही पाहता येत नाही, असे सांगितले असता त्या महिलेने वाहनावर उभे होऊन गोंधळ घातला. अपमानास्पद वागणूक दिली अशी तक्रार आहे. डॉ. सुनील बोरकुटे यांनी तक्रार निलय वनविश्रामगृहाजवळीत कार्यालयात नोंदविली आहे. तसेच वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. प्रकरणी चौकशी आणि कारवाईची मागणी होत आहे.
जिप्सी चालक महिलेविरुद्ध तक्रार प्राप्त झाली आहे. सोमवारी कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे. महिनाभरासाठी वाहन निलंबित केले जाईल किंवा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- भाविक चिवांडे, वनपरिक्षेत्राधिकारी चोरखमारा.
पाणवठ्यावरील बिबट पाहण्यासाठी आमची जिप्सी उभी होती. त्यावेळी महिला जिप्सी चालकाने आपले वाहन आमच्या जिप्सीसमोर उभे केले. वाहन बाजूला करा, असे सांगितले असता त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. वाहनावर उभे होऊन आरडाओरड करीत गोंधळ घातला. कारवाईची अपेक्षा आहे.
-डॉ. सुनील बोरकुटे, पर्यटक, भंडारा.