लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसी प्रवर्गातील गट आणि गणातील निवडणूक घेण्याच्या निर्णयाला स्थगिती कायम ठेवून इतर गट व गणातल्या निवडणुका घ्याव्यात, असा आदेश बुधवारी दिल्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा प्रचार गुरुवारपासून सुरु होणार आहे. मात्र, या सर्व पेचप्रसंगात निवडणुकीतील उत्साह मात्र ओसरल्याचेच चित्र आहे, तर दुसरीकडे प्रचाराला फक्त चार दिवसांचा कालावधी मिळणार आहे.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसह नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात स्थगिती दिल्याने त्या गट व गणातील निवडणूक प्रक्रियेला थांबा देण्यात आला. आज बुधवारी न्यायालयाने तो निर्णय कायम ठेवत ठरल्याप्रमाणे अन्य जागांवर २१ डिसेंबरला निवडणुका घेण्याचा निकाल दिला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे १३ गट व पंचायत समित्यांच्या २५ गणांमधील निवडणुका ओबीसी आरक्षण स्थगितीमुळे होणार नाहीत. मात्र, आता जिल्हा परिषदेच्या ३९ गटातून २३५ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच पंचायत समितीतील ७९ गणांसाठी ४०७ उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्हा परिषद गटातील स्थगित निवडणूक- न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हा परिषदेच्या १३ गटातील, तर पंचायत समित्यांच्या २५ गणातील निवडणुका रद्द झाल्या आहेत. जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत तुमसर तालुक्यातील चुल्हाड, सिहोरा, गर्रा, मोहाडी तालुक्यातील कांद्री, डोंगरगाव, वरठी, लाखनी तालुक्यातील लाखोरी, मुरमाडी, केसलवाडा (वाघ), मुरमाडी (तुप.) येथील निवडणूक रद्द झाली आहे.
आरक्षण नाही तर मतदान नाही- सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालानंतर उर्वरित जागांवर निवडणूक होणार आहे. मात्र, ओबीसींच्या भूमिकेकडे अजूनही उमेदवारांचे लक्ष लागून आहे. ओबीसी आरक्षणातील जागांवरील निवडणुका होणार नसतील तर मतदान करायचे तरी कशाला, अशी भूमिका ओबीसी संघटनांनी घेतली आहे. उमेदवार प्रचाराला गत आठवडाभरापासून फिरत असले तरी गुरुवारपासून ओबीसींच्या बोलण्याला सामोरे जाण्याचीही नामुष्की ओढवणार आहे.
पंचायत समिती गणातील रद्द झालेली निवडणूक- पंचायत समिती गणांतर्गत तुमसर तालुक्यातील साखळी, आंबागड, खापा, देव्हाडी, माडगी, मोहाडी तालुक्यातील पाचगाव, मोहगाव (देवी), पालोरा, साकोली तालुक्यातील कुंभली, वडद, सानगडी, लाखनी तालुक्यातील सालेभाटा, केसलवाडा (वाघ), किटाडी, भंडारा तालुक्यातील कोथुर्ना, धारगाव, खोकर्ला, कोंढी, पहेला, पवनी तालुक्यातील चिचाळ, पिंपळगाव, कोदर्ली, तर लाखांदूर तालुक्यातील मासळ, भागडी, पिंपळगाव (कोहळी) या गणातील निवडणूक रद्द झाली आहे.
नगरपंचायतीत १६८ उमेदवार रिंगणात- मोहाडी, लाखनी व लाखांदूर येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ३९ जागांसाठी १६८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मोहाडी नगरपंचायतीत ५८, लाखनी ६३, तर लाखांदूर येथे ४७ उमेदवार रिंगणात आहेत. मोहाडी येथे सुरुवातीला ७८, लाखनी येथे ७४, तर लाखांदूर येथे ६८ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यामुळे तिन्ही नगरपंचायत क्षेत्रातून २२० उमेदवारांनी २५६ अर्ज दाखल केले होते. आता १६८ उमेदवार रिंगणात असून, प्रभागनिहाय प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र, ओबीसी आरक्षित जागांवरील निवडणुका होणार नसल्याने प्रचारातील उत्सुकता संपल्याचे दिसून येत आहे.