भंडारा जिल्हा भातशेतीसाठी सुप्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात शेतीत शेणखत टाकणे, बांध्या सपाट करणे, केरकचरा पेटविणे, धुरे नीटनेटके करणे, यासह शेत नांगरणे, वखरणे, धुऱ्यावर माती टाकून तुरी लावणे आदी कामाची लगबग सुरू आहे. यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ झालेली वाढ लक्षात घेता, शेतकरी शेणखताकडे वळण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र पाळीव जनावरांची संख्या कमी झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात शेणखत मिळणे कठीण झाले आहे.
‘घंटो का काम मिनटो में’ म्हणून ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची कामे करीत असल्याने बैलजोड्याचे महत्त्व कमी झाले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे, ते आजही यांत्रिक युगात पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी-वखरणी करतानाचे चित्र दिसते. शेतकरी वर्ग आता जनावरे पाळीत नसल्याने शेणखत मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे नाइलाजास्तव रासायनिक खतांचा वापर करावा लागतो. परिणामी शेतजमिनीची सुपिकता नष्ट झाली आहे.
जे शेतकरी जनावरे पाळतात, त्यांच्याकडे शेणखत उपलब्ध असून त्यांनी बांध्यात शेणखत टाकले आहे. कोरोनाच्या सावटात शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळली असून येणाऱ्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे घेण्यासाठी व इतर शेतीविषयक कामासाठी पैशांची जुळवाजुळव करणे शेतकऱ्यांसमोर मोठा गहन प्रश्न आहे. कृषी विभागाने धान्य, बी-बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्यास मोठा दिलासा मिळेल, अशी शेतकऱ्यांना आस आहे. शेतात नांगरणी केल्यानंतर पावसाच्या आगमनाचे वेध मात्र बळीराजाला लागले आहे.