भंडारा : परीक्षा देण्यासाठी तुमसरला जात असताना भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील खैरलांजी गावशेजारी दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात १७ वर्षीय बालकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. मनीष निशांत डहाट गोंडीटोला) असे मृत बालकाचे नाव आहे. मनीषच्या अपघाती मृत्यूने गोंडीटोल्यात शोककळा पसरली आहे.
कला शाखेत शिक्षण घेत असलेला गोंडीटोला येथील मनीष डहाट हा बालक दुचाकी (एम एच ३१ डी एफ ५७७१) ने तुमसरच्या दिशेने निघाला. खैरलांजी गावांचे शेजारी तुमसरहून येणाऱ्या दुचाकीने आमनेसामने जोरदार धडक दिली. मनीष हा प्रात्यक्षिक परीक्षा देण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली आहे. मनीषच्या डोक्याला जबर दुखापत झाली असल्याने उपचारांसाठी तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला भंडारा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असता त्याची प्राणज्योत मालविली.
वडीलांचे दोन वर्षापूर्वीच निधन'
मनीषच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्याने आई आणि बहिणीची जबाबदारी खांद्यावर घेत स्वतःला सावरले. वडिलोपार्जित किराणा दुकान असल्याने त्याने दुकानात लक्ष घातले, सोबत त्याने शिक्षणही सुरू ठेवले. सकाळी दुकान आणि दुपारी तो कॉलेजात जात असे. आईचा एकुलता मुलगा गमावल्याने दुःखाचे डोंगर कोसळला आहे.
राष्ट्रीय महामार्गाने आणखी किती बळी घेणार ?
भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. खड्डे बुजविण्याची कामे करण्यात आली आहेत. परंतु, मार्गाचे कार्पेट करण्यात आले नाही. आश्वासन देऊन अधिकारी मोकळे झाले आहेत. महामार्गाची पूर्णतः दुरुस्ती करण्यात आली नाही. हा राष्ट्रीय महामार्ग आणखी किती जणांचे बळी घेणार, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
डहाट कुटुंबातील तीन तरुण गेले
गोंडीटोला गावात १० घरांचे डहाट कुटुंब आहेत. गत वर्षात मध्यप्रदेशातील कटगी येथे दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या धडकेत गौरव अनिल डहाट (२०) या तरुणांचा मृत्यू झाला. तो आई-वडिलांना एकुलता होता. गत ऑक्टोबर २०२३ महिन्यात आजाराने अभिषेक मनोज डहाट (२१) या तरुणाचा मृत्यू झाला. अभिषेकसुद्धा आई-वडिलांना एकुलता मुलगा होता.