करडी (पालोरा) : साकोली ते तुमसर मार्गावरील पालोरा ते एकोडी-बांपेवाडा पर्यतचा रस्ता पुर्णत: उखडला आहे. वाहन चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे. केव्हा अपघात होईल यांचा नेम नाही. सहा महिन्यापांसून रस्त्यांची दुर्दशा झाली असल्याने अनेक अपघात झाले आहेत तरीही बांधकाम विभागाने लक्ष दिलेले नाही.
सध्या देव्हाडा साखर कारखान्याच्या उसाच्या गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे; परंतु अपघाताच्या वाढलेल्या प्रमाणामुळे वाहतूकदार त्रस्त आहेत. साकोली तालुक्यातील शेतकरी याच मार्गाने ऊस देव्हाडा साखर कारखान्यामध्ये ट्रॅक्टरने आणतात. त्यामुळे केव्हा ट्रॅक्टर पलटी मारेल किंवा आपला जीव गमवावा लागेल, हे सांगता येणार नाही. गाळप हंगामाच्या पहिल्याच दिवशी साकोलीकडून साखर कारखान्यामध्ये ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरने खड्डे व खोल आडव्या नाल्यांमध्ये पलटी मारल्याने वाहनचालक गंभीर जखमी झाला. तो आज दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे बांधकाम विभाग आणखी किती नागरिकांचे जीव घेणार आहे. असे वाहनधारक बोलत आहेत. एक सायकलस्वार केसलवाडाकडे जाताना खड्ड्यात पडला.
दुचाकी अथवा चारचाकी गाडी चालविणे कठीण झाले आहे. साकोनी बांधकाम विभागाने तुमसर ते साकोनी रस्त्याचे नव्याने डांबरीकरणाचे काम करावे. जेणेकरून नागरिकांचे जीव वाचेल व अपघाताचे प्रमाण कमी होईल. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी आता बांधकाम विभागाने घेण्याची गरज आहे. त्वरित रस्त्याची दुरूस्ती करून डांबरीकरण न झाल्यास एखादा अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्यास बांधकाम विभाग जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.