लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : येथील बेलघाटा वॉर्डात १२ दिवसांपूर्वी ज्योत्स्ना जुमळे या विवाहितेची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. दरम्यान तपासाअंती पवनीतील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय शंकर वंजारी याने ज्योत्स्नाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. पवनी न्यायालयात शनिवारी हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.२६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास ज्योत्स्ना जुमळे या विवाहित महिलेची हत्या करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी तपासाची चक्रे फिरवीत विविध प्रकारे तपास सुरु केला. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करुन प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश मिळविले. हत्या प्रकरणात १२ व्या दिवशी शंकर वंजारी रा.पवनी हल्ली मुक्काम पुणे यांच्या बयाणात विसंगती आढळली. यावर सखोल चौकशी करुन वंजारी याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भादंविच्या ३०२, १२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी पवनी न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने वंजारीला सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. जुमळे यांची हत्या कोणत्या कारणाने केली यासह अन्य प्रश्नांचा उलगडा तपासाअंती होणार आहे.
जुमळे हत्या प्रकरणात आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 9:53 PM