जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या आदेशावरून जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने भंडारा शहरातील खात रोड आणि जिल्ह्याच्या अन्य भागात विशेष मोहीम राबविली. यावेळी सायलेन्सरमध्ये बदल, कर्णकर्कश हॉर्न, एक धोकादायक वाहन चालविणे, ट्रिपल सीट, हेल्मेट न वापरणे, काळी काच असलेले वाहन, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या चालकांविरुद्ध करावाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या दरम्यान सायलेन्सरमध्ये बदल केलेली एक मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून वाहतूक नियम पाळण्याबाबत वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आले.
बॉक्स
सावधान तुम्हालाही दंड होऊ शकतो...
शहरात आगामी सणासुदीच्या काळात दुचाकीवरून स्टंटबाजी करताना दिसून आल्यास आता थेट पोलिसांकडून कारवाई होणार आहे. त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करताना, वाहनधारकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन भंडारा पोलीस तथा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे केले आहे, अन्यथा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास थेट पोलिसांकडून कारवाई होणार आहे.