पालांदूर : शासनाने लाॅकडाऊनचे नियम आखून दिल्यानंतरही नियमाला तिलांजली देत काही दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. अशा नियमबाह्य सुरू असलेल्या दुकानांवर महसूल विभाग लाखनी यांनी दंडात्मक कारवाई केली.
वाढत्या गर्दीला रोखण्याकरिता शासनस्तरावरून विशेष नियमावली आखत कडक लाॅकडाऊनचे नियोजन करण्यात आलेले आहे. ३० एप्रिलपर्यंत या लाकडाऊनची मर्यादा आखून दिलेली आहे. तरीही जनसामान्य जनता शासनाने पुरविलेल्या नियमांना तिलांजली देत नियमांची पायमल्ली करीत आहे. गर्दी कमी करण्यासाठी पोलीस विभाग डोळ्यात तेल घालून सेवा पुरवित आहे. मात्र, नागरिकांना याचे गांभीर्य अजूनही कळलेले दिसत नाही. जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ सुरू ठेवण्यात आलेली असताना इतरही दुकाने सुरू असल्याने मार्केटमध्ये गर्दी अनुभवायला मिळत असल्याची बाब पुढे आलेली आहे.
कोरोना संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तालुक्यात दररोज सुमारे दोनशे ते अडीचशे रुग्ण आढळत आहेत. ही साखळी तोडण्यासाठी शासन व प्रशासनस्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, या उपाययोजनांना सामान्य जनतेचा जोपर्यंत प्रतिसाद मिळणार नाही, तोपर्यंत कोरोना रुग्णांची साखळी तुटणे अशक्य आहे. खासगी व शासकीय रुग्णालये फुल्ल आहेत. आरोग्यव्यवस्था संपूर्ण ढासळलेली आहे. औषधींचा तुटवडा भासत आहे. अशा कठीणप्रसंगी जनतेने शासनाने पुरविलेल्या सूचनांकडे विशेष लक्ष देणे काळाची गरज आहे. मात्र, तरुणाई बिनधास्तपणे रस्त्यावर व आडोशाला गर्दी करीत आहे.
पालांदूर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे तपासणीअंती आकडा चिंता वाढवणारा आहे. आरोग्य विभाग प्राथमिक स्तरावरचा उपचार करून विलगीकरणचा सल्ला देत आहेत. रुग्णांना ताप, सर्दी, खोकला अधिक असल्याने औषधांचाही प्रभाव जाणवत नाही. यामुळे विलगीकरणात असलेल्या रुग्णांचे कुटुंबही कोरोनाच्या दहशतीत जीवन जगत आहे. लोकप्रतिनिधी जनसामान्यांच्या सेवेत अपुरे पडले आहेत.
तेव्हा जनसामान्यांनी स्वत:ची नैतिक जबाबदारी समजत शासनाने पुरविलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत घरीच राहून कोरोना साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, अशी रास्त अपेक्षा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.