साकोली : तालुक्यात गत काही दिवसांपासून रेतीची खुलेआम तस्करी सुरु असून याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच शनिवारी महसूल विभागाच्या पथकाने उमरी घाटावर धाड मारुन एक ट्रॅक्टर जप्त करुन तहसील कार्यालयात जमा केले.
साकोली तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यावर आळा घालण्यासाठी तहसीलदार रमेश कुंभरे यांनी अनेक प्रयत्न केले. तरीही रेती तस्करांची दबंगगिरी वाढतच होती. आता अवैध रेती तस्करी आढळताच तात्काळ पोलिसांना पाचारण केले जात आहे. आज उमरी रेतीघाटावर नायब तहसीलदार पवार यांनी आपल्या पथकासह धाड मारली. रेतीतस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर ट्रॅक्टर साकोली तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. यावेळी तलाठी शेखर ठाकरे, तलाठी कवडे उपस्थित होते. ही कारवाई करीत असताना दुसरा ट्रॅक्टर तेथून पळून गेला.
महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी अवैध रेती तस्करांच्या शोधात आहेत. रेती तस्करीची माहिती झाल्यास तात्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधुन माहिती द्यावी असे आवाहन तहसीलदार रमेश कुंभरे यांनी केले आहे. तस्करांचे यामुळे धाबे दणाणले आहे.