भंडारा : लॉकडाऊनच्या काळात वर्षभरात कोरोना नियमांचे उल्लंघन करून दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या तब्बल ३,१८१ स्वारांवर जिल्हा वाहतूक शाखेने कारवाई करून त्यांच्याकडून सहा लाख ३६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आली आहे.
जिल्हा वाहतूक शाखेने कोरोना संसर्गाच्या काळात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाईचे धोरण अवलंबले होते. दिनांक १ एप्रिल २०२० ते १७ मार्च २०२१ या कालावधीत भंडारा जिल्हा वाहतूक शाखेने ३,१८१ वाहन चालकांवर कारवाई केली.
कोरोना काळात दुचाकीवर एकाच व्यक्तीने प्रवास करण्याचे बंधन घालण्यात आले हाेते. मात्र, तरीही अनेकजण ट्रिपल सीट जात होते. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेकांनी दुचाकीवरून प्रवास केला. मात्र, काही टारगट लोकांनी ट्रिपल सीट प्रवास करून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. अशा सर्व दुचाकीस्वारांवर जिल्हा शाखेने करडी नजर ठेवून कारवाई केली. विशेष म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातच ही कारवाई अधिक झाली आहे. भंडारा शहरात अनेकजण विनाकारण दुचाकीवरुन ट्रिपल सीट फिरताना दिसतात. अशा तरूणांवरही कारवाई करण्यात आली आहे. आता ही मोहीम आणखी तीव्र करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहे. शहरात विनाकारण भटकंती करणाऱ्या अशा दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करताना दुचाकीस्वाराचा पाठलाग केला जात नाही. पाठलाग केला तर दुचाकीस्वार वेग वाढवून अपघाताला आमंत्रण देवू शकतात. त्यामुळे अशा दुचाकीचा नंबर घेऊन कारवाई केली जाते. दुचाकी चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन केले नाही तर अपघाताची शक्यता असते. त्यामुळेच अशा स्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येतेे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा विशेष माेहीम राबवली जाईल. दुचाकी चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन केले नाही तर अपघाताची शक्यता असते. त्यामुळेच अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येतेे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा विशेष माेहीम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणार असल्याचे जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख शिवाजी कदम यांनी सांगितले.
बॉक्स
मोबाईलवर बोलणाऱ्या ९६ जणांना दंड
दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलून अपघाताला आमंत्रण देणाऱ्या ९६ जणांवर गेल्या तीन महिन्यांत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणाऱ्या ६७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. रेड सिग्नल तोडणे आणि ओव्हर स्पिडची मात्र या तीन महिन्यांत कुठेही कारवाई झालेली नाही.
-