लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : तुळशी विवाह आटोपल्याने आता लग्नांची धूम सुरू झाली आहे. मात्र, अलीकडे मिरवणूक, लग्नाच्या वरातीत तसेच रिसेप्शनमध्ये डीजे वाजविण्याची जणू प्रथाच सुरू झाली आहे. परंतु, आता लग्नात विनापरवानगी डीजे वाजविल्यास पोलिस कारवाईची शक्यता आहे. त्यामुळे लग्नात डीजे वाजविण्याचा विचार करणाऱ्यांनी परवानगी घेतली नाही तर चांगलेच महागात पडू शकते. प्रसंगी पोलिस कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
लग्न असो वा अन्य कार्यक्रम डीजे वाजविण्याची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ज्या परिसरात लग्न आहे. तेथील पोलिस ठाण्यात जाऊन लग्नात डीजे वाजविण्यास परवानगी काढावी लागते. मात्र, अनेकजण घेण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. परवानगी न घेताच डीजे वाजविल्यास संबंधितांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ शकतो.
..तर होणार डीजेंवर कारवाईराज्यात विविध सण, उत्सव, लग्न व रिसेप्शनमध्ये तसेच मिरवणुकांमध्ये शहरात परवानगी न घेता डीजे वाजविल्याप्रकरणी अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु अनेकदा परवानगी न घेता डीजे वाजविण्याचे प्रकार दिसून येतात.
५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज नकोनागरिकांनी कोणताही कार्यक्रम आनंद व उत्साहात साजरे करावे; मात्र नियमांचे उल्लंघन करू नये, तसेच इतरांना कोणताही त्रास होईल, असा प्रकार करू नये. कुठल्याही सण, उत्सव व कार्यक्रमात ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाने वाद्य वाजविल्यास कारवाई करण्यात येते.