लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता जणू एक उत्सवच सुरू झाला आहे. या काळात कार्यकर्ते अधिक उत्साही असतात. मात्र, अति उत्साहात नियम मोडला गेल्यास त्यावर यंत्रणेची नजर राहणार आहे. अनेकदा मतदारसंघ मोठा असल्यामुळे अनेक उमेदवार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयल करत असतात. मात्र, उमेदवाराचा प्रचार करताना कार्यकर्त्यांनाही आचार संहितेचे पालन करावे लागणार आहे. त्यांच्यावरही काही नियम, निर्बंध घातले आहेत.
आदर्श आचार संहितेचे पालन होण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संपूर्ण यंत्रणेला निर्देश दिले आहेत. त्यासाठी आढावासुध्दा घेतला जाणार आहे.
प्रचार वाहनांसाठी परवानगी प्रचार वाहनांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे. अर्ज, वाहनाचे आरसी बुक सादर करणे, वाहनाचा विमा, कर भरणा पावती, पीयूसी, फिटनेस प्रमाणपत्र, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करावे लागेल. वाहनाचा चारही बाजूचा फोटो, तसेच संबंधीत वाहनासाठी पोलिसांचा नाहरकत दाखला आवश्यक आहे.
झेंडे, भित्तिपत्रके लावण्यास निर्बंध खासगी जागेत झेंडे, भित्तिपत्रके लावण्यासाठी मालकाच्या परवानगीची आवश्यकता. झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी बॅनर, घोषणा लिहिण्यासाठी संबंधित यंत्रणेची परवानगी आवश्यक, इमारतीचे आवार, भिंती यावर पत्रक, जाहिराती लावण्यासाठी जागा मालकाची परवानगी आवश्यक आहे.
इथे ध्वनिक्षेपकास मनाई आहे पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. सकाळी सहा वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर ध्वनिक्षेपक वापरावर बंदी आहे. ध्वनिक्षेपकासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध करण्यात आला आहे. फिरणाऱ्या वाहनांनी ठिकाणी थांबूनच प्रचार करावा. ध्वनिक्षेपकाचा वापर, विशिष्ट ध्वनिक्षेपकाच्या परवानगीची माहिती कळविणे बंधनकारक आहे.
"निवडणुकीदरम्यान प्रचार करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यात प्रचार वाहन, ध्वनिक्षेपक, झेंडे, बॅनर अशा सर्वच घटकांसाठी त्या- त्या विभागांची परवानगी घ्यावी लागणार आहे. आचारसंहितेचे सर्व राजकीय पक्षांनी काटेकोरपणे पालन करणे करावे." - डॉ. संजय कोलते, जिल्हाधिकारी