राष्ट्रीय महामार्गावरुन धावणाऱ्या ट्रकमधून साहित्य चाेरीस जाण्याच्या तक्रारी गत दाेन वर्षांपासून सुरू आहे. परंतु चाेरटे अद्यापही हाती लागले नाही. एखाद्या ट्रकचा पाठलाग करुन रात्रीच्या वेळी या ट्रकमधील साहित्य दुसऱ्या वाहनात टाकून चाेरी करण्याचा हा प्रकार आहे. सर्वाधिक घटना माैदा ते साकाेली दरम्यान घडल्या आहेत. अनेक ट्रक चालकांना व मालकांना त्याचा फटका बसला. परंतु घटनास्थळ नेमके काेणते हे कळायला मार्ग नसल्याने पाेलिसही तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात.
गुरुवारी रात्री एक ट्रक ॲम्वे कंपनीचे साहित्य घेवून जात हाेता. त्या ट्रकच्या मागे एक आयशर ट्रक पाठलाग करीत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. माैदा ते लाखनी दरम्यान या ट्रकमधून चार लाख रुपयांचे साहित्य चाेरीस गेल्याचे दिसले. त्यावरून चालकाने शाेध घेतला असता एक ट्रक आढळून आला. त्यात चार लाख रुपयाचे ॲम्वे कंपनीचे साहित्य दिसले. त्यावरुन कारधा पाेलीस ठाण्यात लवकुश तिवारी यांनी तक्रार दिली. पाेलिसांनी ट्रकसह चार लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. चाेरटे मात्र पसार झाले असून कारधा पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत.
बाॅक्स
घटनास्थळाच्या वादात तक्रारीस टाळाटाळ
राष्ट्रीय महामार्गावरून धावत्या ट्रकमध्ये चाेरी केली जाते. परंतु चाेरी नेमकी कुठे झाली हे निश्चित नसते. त्यामुळे तक्रार काेणत्या पाेलीस ठाण्यात द्यायची हा प्रश्न असताे. जवळच्या पाेलीस ठाण्यात गेल्यास सर्वप्रथम घटनास्थळाचा मुद्दा उपस्थित करून पाेलीस तक्रारीस टाळाटाळ करतात. गत वर्षभरापूर्वी अशाच प्रकार घडला हाेता. मात्र यावेळी कारधा पाेलिसांनी ट्रक व साहित्य ताब्यात घेवून चाैकशीस सुरुवात केली. त्यामुळे ही टाेळी लवकरच हाती लागेल, अशी आशा आहे.