भंडारा : कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित झाले असून, आगामी संकट टाळण्यासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात १३ केएल क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने अदानी समूह हा प्लांट उभारणार असून, तीन महिन्यांत तो कार्यान्वित होणार आहे.
एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. रुग्णालयात खाटांची आणि ऑक्सिजनची समस्या निर्माण झाली होती. ऑक्सिजनअभावी कोविड रुग्ण दगावण्याची शक्यता दिसत होती. हे गंभीर संकट ओळखत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आयनाॅक्स कंपनीच्या संचालकांशी बोलून तातडीने ४० टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करून दिले होते. आता ऑक्सिजनच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अदानी विद्युत प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्याबाबत अदानी समूहाचे गौतम अदानी यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी १३ केएल क्षमतेचा प्लांट उभारण्यासंदर्भात हिरवा झेंडा दिला. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. याबद्दल खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आभार मानले. तसेच १३ केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक गोंदियात केटीएस सामान्य रुग्णालयात खासदार पटेल यांच्या पुढाकाराने सुरू झाले आहे.
जिल्ह्यावरील प्राणवायूचे संकट दूर होणार
कोरोना संसर्गात प्राणवायूचे महत्त्व लक्षात घेता खासदार पटेल यांनी तातडीने पावले उचलली. अदानी समूहाने भंडारा येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याची तयारी दर्शवली. खासदार पटेल यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प होत असल्याने जिल्हावासीयांनी त्यांचे आभार मानले. जिल्ह्यातील ऑक्सिजनसंदर्भात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सुद्धा सातत्याने पाठपुरावा केला. भंडारा येथील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हाॅलमध्ये सुविधायुक्त कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले.