भंडारा : तुमसर तालुक्यातील मॅग्नीज आणि रेती व्यावसायिक नईम शेखचा खून झाला त्या दिवशी दिवसभर पाळत ठेवून असलेल्या आणि मुख्य सूत्रधाराला नईम शेखची संपूर्ण माहिती पुरविणाऱ्या लकी मनोज घडले (२६, नाकाडोंगरी, ता.तुमसर) याला पोलिसांनी आज अटक केली. त्याच्या अटकेमुळे या खून प्रकरणातील गुन्हेगारांची संख्या दहावर पोहोचली आहे, एक आरोपी फरार आहे.
पोलिसांनी मुख्य सूत्रधार संतोष डहाट याला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता लकी घडले याने खुणाच्या दिवशी तब्बल ३३ कॉल केलेले दिसून आले. यावरून त्याला ताब्यात घेऊन आज (गुरुवारी) अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
मध्यप्रदेशातून घेतले होते नवीन सिम आणि मोबाईलनईम शेख याचे लोकेशन संतोष डहाट याला पुरविण्यासाठी लकीने गेल्या आठवड्यातच मध्य प्रदेशातील बोनफाटा येथून एक सिमकार्ड आणि नवीन मोबाईल खरेदी केला होता. घटनेच्या दिवशी सोमवारी दुपारी एक वाजतापासून त्याने नईम शेखवर पाळत ठेवून त्याची संपूर्ण माहिती संतोष डहाटला पुरविली होती. फक्त चार तासात त्याने संतोषच्या मोबाईलवर ३३ कॉल केलेले तपासात आढळून आले. संपूर्ण कार्यभाग आटोपल्यानंतर काही झालेच नाही अशा अविर्भावात तो गावात परतला होता.
लकी करायचा पतसंस्थेत कामयापूर्वी लकी घडले एका पतसंस्थेत काम करायचा. त्यानंतर त्याने ते काम सोडून टॅक्सीचा व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान तो संतोष दहाच्या संपर्कात आला. नईम शेखच्या खून प्रकरणात तो इन्फॉर्मर ठरला. नईम शेखच्या लोकेशनची त्याने संपूर्ण माहिती कळविली नसती, तर हा खूनच झाला नसता, असा युक्तिवाद वकिलांनी न्यायालयात करून लकीचा मुख्य आरोपीमध्ये समावेश करण्याची विनंती केली.
आरोपींची संख्या दहावरया प्रकरणी आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे. अटक केलेल्यांमध्ये संतोष डहाट, त्याचा भाऊ सतीश डहाट (दोघेही आंबेडकर वार्ड, तुमसर), शुभम उर्फ सागर पंधरे (नवीन हसारा टोली तुमसर), गुणवंत उर्फ अतुल यवकार (३०, नाका वाडी, नागपूर), आशिष नेवारे (३२, जयताळा, नागपूर), रवी रतन बोरकर (३५, जरीपटका, नागपूर), दिलखुश उर्फ मोनू कोल्हटकर (२८, मालवीय नगर, तुमसर) आणि अमन मेश्राम (२९, आंबेडकर वार्ड तुमसर) यांचा समावेश आहे. तर विशाल मानेकर (३२, हुडको कॉलनी, नागपूर) हा अद्यापही फरार आहे. पोलिसांचे पथक त्याच्या मागावर आहे.या सर्व आरोपींवर कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ सह कलम ३/२५, ४/२५, २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.