चुल्हाड ( सिहोरा ) : सिहोरा परिसरात पोलीस पाटलाचे पदे रिक्त असल्याने अतिरिक्त प्रभार देण्याचे आदेश धडकले आहे. कार्यरत पोलीस पाटलांना लांब पल्ल्याचे गावांचे प्रभार देण्यात आले आहे. यामुळे पोलीस पाटलांवर कामाचा व्याप वाढला आहे. परिसरात ४७ गावे असून कार्यरत २१ पोलीस पाटील आहेत. पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
जंगलव्याप्त आणि वैनगंगा, बावनथडी नद्याचे काठावर असणाऱ्या सिहोरा गावाला उप तालुक्याचा दर्जा प्राप्त आहे. अधूनमधून तालुका निर्मितीची मागणीही होत आहे. गावात तालुका निर्मितीला लागणाऱ्या बहुतांश सुविधा रेडिमेड उपलब्ध आहेत. विकासापासून वंचित व रोजगार नसल्याने तालुका निर्मितीची मागणी नागरिकांतून जोर धरत असली तरी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने मागणी थिटे ठरत आहे.
या परिसरात असणाऱ्या प्रत्येक विभागात रिक्त पदाचा अनुशेष आहे. पंचायत, पाटबंधारे विभाग, शिक्षण, आरोग्य अशा अनेक विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे. सारेच विभाग टेन्शनमध्ये कार्य करीत आहेत. गाऱ्हाणे मांडले तर कुणी ऐकत नाहीत. ४७ गावांचे सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस ठाण्यात रिक्त पदाची स्थिती ठिकठाक नाही. ५३ पदे असताना फक्त २५ पोलीस कार्यरत आहेत. यापैकी अनेक साप्ताहिक व रजेवर असल्याने तपास कार्य प्रभावित होत आहे. परंतु रिक्त पदे भरले जात नाहीत. बपेरा पोलीस चौकीचे नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी अवस्था झाली आहे.
पोलीस ठाण्यात रिक्त पदे असताना चौकीत कुठून पोलीस आणायचे असा सवाल आहे. पोलीस खात्याला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. गावात कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. ४७ गावात फक्त २१ पोलीस पाटील कार्यरत आहेत. अनेक गावाला पोलीस पाटील नाहीत. वारसांना नोंदणीसाठी पोलीस पाटलांच्या दाखल्याची गरज लागत आहे. याच दाखल्यांना ग्राह्य धरण्यात येत आहे. परंतु गावात पोलीस पाटील नसल्याने गावकऱ्यांची धांदल उडत आहे. गावचे पोलीस पाटील नसल्याने दाखले मिळत नाहीत. मध्यंतरी पोलीस पाटील भर्ती घेण्याची चर्चा होती, परंतु हवेत विरली आहे. पोलीस पाटलांना अतिरिक्त प्रभार देण्याचे आदेश धडकले असून अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. पोलीस पाटलांना लांब पल्ल्याचे गावांचे प्रभार देण्यात आले आहे. यामुळे त्यांची कसरत सुरु झाली आहे. शेजारी गावाचा प्रभार सांभाळताना अडचण नाही. परंतु ७ ते ८ किमी अंतरावरील गावात रात्री घटनास्थळी जाताना जिव्हारी लागणार आहे. शासनाने तत्काळ पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी भाजपचे युवा नेते किशोर राहगडाले यांनी केली आहे.