भंडारा : आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्याच्या ढासळलेल्या गुणवत्तेवर उपाय म्हणून आदिवासी विभागाने शिक्षकांची गुणवत्ता क्षमता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुशंगाने गुणवत्ता क्षमता चाचणी परीक्षा १७ सप्टेंबरला घेतली जाणार आहे. या निर्णयाविरोधात आदिवासी संस्कृती संघटना, विभाग नागपूर यांनी परिक्षेवर बहिष्कार घातला आहे.
आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांशी कोणत्याही प्रकारे चर्चा न करता शिक्षकांची क्षमता तपासणीचा आदिवासी विभागाने निर्णय घेतला आहे. आदिवासी आश्रम शाळेतील कार्यरत शिक्षक हे डीएड, बीएड अहर्ताधारक आहेत. त्यांनी यापूर्वीच शैक्षणिक व व्यावसायिक गुणवत्ता धारण केलेली आहे. अहर्ताधारक शिक्षकांवर प्रश्नचिन्ह निर्माण करून आदिवासी विभागाने घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. शिक्षकांची गुणवत्ता तपासण्याकरिता क्षमता चाचणी परीक्षेचे आयोजन करणे चुकीचे आहे. या परीक्षेवर आदिवासी संघटनांनी बहिष्कार टाकलेला आहे. संघटनेचे अध्यक्ष भोजराज फुंडे यांनी या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त करीत शिक्षकांना परीक्षा न देण्यास जाहीर आवाहन त्यांनी केले आहे.