देवानंद नंदेश्वर
भंडारा : जिल्ह्यातील (श्रीक्षेत्र आंभोरा) मौदी भातहांडी वैनगंगा नदीच्या काठावर प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिर आहे. ६ एप्रिलला हनुमान जयंती असल्यामुळे मंदिराचे पुजारी मधुकर सोनटक्के मंदिराची साफसफाई करण्यासाठी जात असताना त्यांना अड्याळ पोलिसांनी रोखून मंदिरात जाण्यापासून मज्जाव केला. त्यानंतर पोलिस वाहनात बसवून पहेला येथे सोडून दिले. या प्रकाराने भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
सध्या या मंदिराच्या चारही बाजूने गोसे खुर्द धरणाचे पाणी साचले आहे. याअगोदर मंदिर परिसरात हजारो भाविकांची यात्रा भरायची. आता पाणी असल्यामुळे भाविकांची वर्दळ कमी झाली आहे. मंदिरालगतच पुलाचे बांधकाम सुरू आहे. परंतु, मंदिरात जाण्यासाठी रस्ता बनवला नाही. त्यामुळे मंदिरात नावेच्या सहाय्याने जावे लागते.
याच नदीपात्रातून दररोज मासेमारी करणाऱ्या बोटीने प्रवाशांची अवैध वाहतूक सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने मौदी ते आंभोराकडे जाणाऱ्या प्रवाशांची तत्काळ व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे मंदिरात पूजा करण्यासाठी रोखणाऱ्या प्रशासनाने मंदिराची देखभाल व पूजा आपल्या यंत्रणेमार्फत करावी. अन्यथा, प्रशासनाचा निषेध करून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुभाष आजबले, पूजा ठवकर, प्रवीण उदापुरे, बालू ठवकर, स्वप्निल आरीकर यांनी दिला आहे.