जिल्हाधिकारी : सैन्य भरतीपूर्व तयारीसाठी आढावा बैठक भंडारा : सैन्य भरती रॅली आयोजित करण्यासाठी भंडाऱ्याची निवड होणे ही जिल्हयासाठी अभिमानास्पद बाब आहे. रॅलीचे आयोजन यशस्वीपणे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिली. सैन्य भरतीच्या पुर्व तयारीच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. यावेळी नागपूर विभागाचे सेना भरती संचालक कर्नल महेंद्रकुमार जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन उपस्थित होते. ही सैन्य भरती जिल्हा क्रिडा संकुलात घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा क्रीडा संकुलातील आवश्यक सुविधांची दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मैदानावर विद्युत दिवे, शामियाने, फर्निचर, प्रसाधनगृह, कचराकुंडी, पाणी सुविधा नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने उपलब्ध करुन देण्याविषयी चर्चा झाली. भरतीच्या ठिकाणी रुग्णवाहिका आणि डॉक्टरांच्या २ चमु ठेवावे. दुरध्वनी सेवा, विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी बाहेर जावे लागू नये म्हणून झेरॉक्स मशिन आणि छायाचित्राची तात्काळ सेवा देणारा छायाचित्रकार देण्यात येईल. उमेदवारांना निवास व भोजन व्यवस्था उपलब्ध करुन देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दीपक लिमसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सैन्य भरतीसाठी प्रशासन सहकार्यासाठी तत्पर
By admin | Published: December 04, 2015 12:56 AM