साकोली : लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गाबाई डोह कुंभली यात्रेला येत्या १४ तारखेपासून प्रारंभ होत आहे. ही यात्रा विदर्भात प्रसिद्ध आहे. या यात्रेत येणाऱ्या भाविकासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी दिली. कुंभली येथील दुर्गाबाई डोह यात्रेच्या आढावा सभेत ते बोलत होते. यावेळी उपस्थित आमदार बाळा काशीवार म्हणाले, या यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची, पिण्याच्या पाण्याची योग्य सोय करण्यात आली असून पोलिसांचा चोख बंदोबस्त व आरोग्य यंत्रणेची सुविधा करण्यात आली आहे. या यात्रेदरम्यान दारू, जुगार सारखे अवैध धंदे सुरू राहणार नाही याची दखल पोलीस विभागाला घेण्याचे निर्देश खासदार नाना पटोले यांनी दिले आहे. संबंधित विभागाला पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य शिबिर व रुग्णांना औषधोपचार, यात्रेदरम्यान विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. सर्वत्र लाईटची व्यवस्था करण्यात आली. अवैधरित्या वसुली करणाऱ्यांची तक्रार पोलिसात करण्यात यावी, अशा सुचना करण्यात आली. यात्रेदरम्यान अग्नीशामक दलाची सोय करण्यात यावी, आगार व्यवस्थापकानी जादा बसेसची सोय करावी, महसूल विभागातर्फे नियोजन व समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. यात्रेच्या ठिकाणी कायमस्वरूपी बॅरीगेट्स लावण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती धनपाल उंदीरवाडे, उपसभापती बर्वे, साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत, कुंभलीच्या सरपंच, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, उपविभागीय अभियंता यांच्यासह सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
दुर्गाबाईडोह यात्रेकरिता प्रशासन सज्ज -पटोले
By admin | Published: January 06, 2017 12:49 AM