पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडले. त्यांनतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख रवी वाढई उपस्थित होते. व्हेंटिलेटर जिल्हा शल्य चिकित्सकांना ना. सामंत यांच्या उपस्थितीत हस्तांतरित करण्यात आले. या व्हेंटिलेटरचा लाभ गरजू रुग्णांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री सामंत यांनी यावेळी जिल्ह्याचा कोविडबाबतचा आढावा घेतला. जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक दर १.२२ टक्क्यापेक्षा कमी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. यावर मंत्र्यांनी भंडारा जिल्ह्याने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा करून समाधान व्यक्त केले.
कोरोना नियंत्रणात प्रशासनाचे कार्य प्रशंसनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:47 AM