भंडारा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक अशा भूमिगत गटार योजनेला शासनाने काही दिवसांपूर्वी तांत्रिक मान्यता प्रदान केली होती. १६७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दरम्यान, १६७ पैकी ११६ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याला शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. शासकीय मान्यता मिळाल्यामुळे आता निविदाप्रक्रिया होऊन प्रत्यक्ष लवकरच कामाला सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली आहे.
शासननिर्णयानुसार १० जुलै २०१७ च्या सर्वसाधारण सभेत या प्रकल्पासाठी भंडारा नगर परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगातून १८ कोटी रकमेचा, लोकवर्गणीचा १५ टक्के सहभाग मागविण्याबाबतचा ठराव नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते मंजूर केला होता. या कामाला सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली होती.
बॉक्स
नगराध्यक्ष सुनील मेंढे यांची महत्त्वाकांक्षी योजना
नगराध्यक्षांची निवडणूक लढविताना भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांनी या योजनेचा समावेश घोषणापत्रात केला होता. नगराध्यपदी विराजमान झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजना मंजुरीसाठी प्रयत्न केले. मलनिस्सारण केंद्राच्या जागेसाठी वारंवार गोसेखुर्द प्रकल्पाशी पाठपुरावा करून दोन ठिकाणच्या जागा लीजवर मिळविण्यात नगराध्यक्षांची भूमिका महत्त्वाची होती. नवीन पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटार योजना हे दोन्ही प्रकल्प नगराध्यक्षांचे महत्त्वाकांक्षी आहेत. त्यानुसार पाणीपुरवठा योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. दरम्यान, भूमिगत गटार योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. जुलै महिन्यात १६७ कोटींच्या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाली होती. पाणीपुरवठा योजनेचे ५० टक्के काम पूर्ण झाले असल्याने भुयारी गटार योजनेच्या पहिला टप्प्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
कोट
भूमिगत गटार योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली असून माझ्यासह सहकारी नगरसेवक यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. यामुळे आता लवकरच भंडारा शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू झाल्याचे पहायला मिळेल. या योजनेमुळे भंडारा शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
-सुनील मेंढे
नगराध्यक्ष तथा खासदार