मोहाडी : आजपर्यंत त्या गावात अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती सरपंच होऊ शकली नाही. त्यासाठी तब्बल ७२ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. आरक्षणानेच ही प्रतीक्षा संपविली आहे. कान्हळगाव (सिरसोली) या ग्रामपंचायतीच्या निर्मितीनंतरच प्रथमच तब्बल ७२ वर्षांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती जागेश्वर मेश्राम यांच्या स्वरूपात सरपंचपदी पहिल्यांदाच विराजमान झालेली आहे. या ऐतिहासिक क्षणाची नोंद कान्हळगाव ग्रामपंचायतच्या इतिहासात प्रथमच होणार आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ते एकमेव अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आले. त्यामुळे जागेश्वर मेश्राम सरपंचपदी बिनविरोध निवडून आले. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार गावकरी होते. गुलाल उधळून जागेश्वर मेश्राम यांचे स्वागत केले. कान्हळगाव ग्रामपंचायत पिंपळगाव व सिरसोली या तीन गावांत मिळून बनलेली होती. दि. २ नोव्हेंबर १९४८ ग्रामपंचायत कान्हळगाव स्थापना झाली. याच दिवशी प्रीतलालसिंह सव्वालाखे कान्हळगावचे प्रथम सरपंच बनले. त्यानंतर सिरसोली येथील नूरबेग मोगल १९६६-१९७०, सिरसोलीचेच ईलाई शेख १९७०-१९७५पर्यंत सरपंच झाले होते. त्यानंतर १९७५ला गट पाडून सिरसोली व पिंपळगाव स्वतंत्र ग्रामपंचायती करण्यात आल्या. १९४८ ते २०१९ यादरम्यान ११जण कान्हळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर विराजमान झाले. यात तीन महिला, तर आठ पुरुष सरपंचाचा समावेश आहे.
२ ऑगस्ट १९८१ ते ४ ऑगस्ट १९९५ या काळात निवडणूक न होता सलग १४ वर्ष पौर्णिमा सव्वालाखे सरपंच होत्या. तत्पूर्वी १९४८-१९६६ असा दीर्घकाळ १८ वर्ष सरपंच पदावर राहण्याचा मान प्रीतलालसिंह सव्वालाखे यांना जातो. १९४८-२०२१ या ७२ वर्षांच्या कालखंडात अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील एकही व्यक्ती कान्हळगावात सरपंच झालेला नव्हता. आरक्षणामुळे सात दशकानंतर पहिल्यांदाच जागेश्वर मेश्राम यांच्या रूपाने अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील व्यक्ती कान्हळगावचे प्रथम नागरिक म्हणून गावाचे नेतृत्व करणार आहेत. तसेच कांचन निबांर्ते उपसरपंच पदावर निवडून आल्या.
सरपंच व उपसरपंच निवडणुकीनंतर गुलाल उधळून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा स्वागत करण्यात आला. यावेळी आयटक नेते माधवराव बांते, ग्रामपंचायत सदस्य प्रभा बांते, विकास ठवकर, माजी पंचायत समिती सदस्य केशव बांते, माजी सरपंच बाळू बोबडे, माजी सरपंच राजू ऊपरकर, दिग्विजय मेश्राम, मुन्ना निबांर्ते, रामू वहिले, सतीश बांते, शंकर शेंडे, महेश गजभिये, राजू निबांर्ते, विजय निबांर्ते, अनूप बांते, राकेश वहिले, गणेश बांडेबुचे, जयदेव लुटे, राजू धांडे, ग्यानी निबांर्ते, मारोती निबांर्ते, कवडू चामट, रमेश तितीरमारे, प्रशांत सुखदेवे, विष्णू गजभिये, संतोष मलगामे, मोहन वहिले, कोमल उटाणे, नरेश मेश्राम, देवसिंग नागपुरे, आशिष मेश्राम आदी उपस्थित होते.
बॉक्स
राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
कान्हळगाव येथील नवनिर्वाचित सरपंच जागेश्वर मेश्राम, उपसरपंच कांचन नीबांर्ते यांचेसह मुन्ना नीबांर्ते यांनी मोहाडी येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात अधिकृतपणे आमदार राजू कारेमोरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.