बसस्थानकावरील समस्यांचे प्रकरण : प्रसाधनगृहाची होणार सफाई, तातडीने मार्गावरील खड्डे बुजविलेविशाल रणदिवे । लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळचे बसस्थानक नेहमी चर्चेचा विषय बनले आहे. येथील मुख्य समस्या म्हणजे बसायला स्वच्छ जागेचा अभाव, महिला व पुरूष प्रसाधनगृहाची अस्वच्छता आणि बस स्थानकासमोरील खड्डे यामुळे अड्याळ ग्रामस्थ तथा प्रवासी त्रस्त झाले होते. या आशयाचे वृत्त आज ‘लोकमत’ने प्रकाशित केले. यामुळे ग्रामपंचायतने त्या विषयाची गंभीरतेने दखल घेऊन बसस्थानकासमोरील खड्डे बुजविले. व महिला व पुरूष प्रसाधनगृहाची सुद्धा साफसफाई त्वरीत करण्याचे निर्देश ग्रामविकास अधिकारी तथा सरपंच यांनी कर्मचाऱ्यांना दिले. ‘समस्याग्रस्त बसस्थानकात प्रवाशांचा जीव धोक्यात’ या आशयाचे वृत्त आज ‘लोकमत’ने ्रप्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच ग्रामपंचायत प्रशासनात एकच खळबळ उडाली. सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी तातडीने सदस्यांसोबत चर्चा केली. यानंतर समस्यांचा निपटारा करण्यासाठी बसस्थानक परिसर गाठले. यांनतर ग्रामपंचायतने खड्डे बुजविले. दरम्यान बसस्थानक व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदरी केवळ ग्रामपंचायतची की व्यवसायीकांचीही हा ही एक प्रश्न अनेकांसमोर उपस्थित झाला. विशेष म्हणजे अड्याळ हे एकमेव मोठे गाव असेल की जिथे प्रवासी निवाऱ्याची पक्की इमारत नाही. असे असतानाही ग्रामपंचायतने एसटी महामंडळाला येथे एका कर्मचाऱ्याला बसण्याकरिता जागा उपलब्ध करून दिली आहे. येथून शेकडो विद्यार्थी बसपास काढतात. ग्रामपंचायतीने याआधी सुद्धा बसस्थानकासाठी वेळोवेळी थोडीफार मदत केली आणि त्यामुळेच प्रवासी निवाऱ्यांचा कापडी शामियाना उभा झाला, हेही एक सत्य आहे.बसस्थानकातील समस्या आणि त्याही पेक्षा अतिक्रमण याविषयी लवकरच येथील दुकानदारांना नोटीस देणार असल्याची माहिती आहे. अतिक्रमणामुळे काय काय झाले हे अड्याळवासी अनुभवून आहेत. येथील महिला प्रसाधनगृहाकडे जाण्याच्या मार्गावरून जाता येत नसल्यामुळे तो मार्ग मोकळा करून देण्याची मागणी होत आहे. सोबतच साफसफाई व प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्थाही करण्याकडे ग्रामपंचायतने आता लक्ष पुरविण्यावर भर देण्याचे अभिवचन दिले आहे. या प्रवासी निवाऱ्यासाठी काहीही श्रमदान केले तर काहींनी धन दान केले हे फक्त गावासाठीच यामध्ये आजपर्यंत कुठलीही राजनिती नव्हती त्यामुळेच की काय अड्याळ लाईव्ह ग्रुपचे सोशल मिडियाचे मुख्य कलीम शेख यांच्या कल्पनेचे आजही लोक कौतूक करतात. येथील उभ्या असलेल्या कापडी शामियानाला काढून दुरूस्त करण्यात येईल. प्रवाशांना बसण्याची व प्रसाधनगृहाची साफसफाई वेळोवेळी करण्यात येणार असल्याचे मत उपसरपंच देविदास नगरे यांनी मांडले. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्याने ग्रामपंचायत प्रशासन जागे झाले, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त करीत ‘लोकमत’चे आभार मानले.
अखेर ग्रामपंचायतच्या पुढाकारातून समस्या लागल्या मार्गी
By admin | Published: July 14, 2017 12:55 AM