भंडारा : जिल्हा सामान्य रूग्णालयातील अस्थिरूग्ण विभागात महिनाभरापासून काही रूग्ण शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले होते. मात्र, त्यांची या विभागात हेडसांड होत होती. याबाबत बुधवार ४ फेब्रुवारीच्या अंकात 'लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशित होताच रूग्णालय प्रशासनात खळबळ उडाल्याने 'त्या' रूग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.सामान्य रूग्णालयात अस्थिरूग्णांसाठी वॉर्ड क्रमांक १५ राखिव ठेवला आहे. भंडारा तालुक्यातील आंबाडी येथील बलदेव दयाराम बावनकर, मोहाडी तालुक्यातील श्रीराम उरकुडा खाटेकर व तुमसर तालुक्यातील शुभम डूलीराम शेंडे यांच्यासह काही अस्थिरूग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र, रूग्णालय प्रशासन त्यांना शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात महिनाभरापासून भूलथापा देत होते. शस्त्रक्रियेसाठी आॅपरेशन थिएटरमध्ये नेऊन भूलतज्ज्ञ व शस्त्रक्रियेचे साहित्य नसल्याचे सांगून परत वॉर्डात पाठवित होते. असा प्रकार महिनाभरापासून सुरू होता. यामुळे रूग्णांमध्ये रोष व्यक्त होत होता. रूग्णालयाकडून रूग्णांची थट्टा चालविली जात असल्याने सदर प्रतिनिधीने रूग्णालयात रूग्णांची भेट घेतली. यावेळी रूग्णांनी कौफियत मांडली. याबाबत लोकमतने बुधवारच्या अंकात 'आॅपरेशन थिएटरमधून पाठवितात रूग्णांना' या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. यामुळे रूग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. महिनाभरापासून रूग्णालयात खितपत पडलेल्या रूग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्या. महिनाभरापासून रूग्णांना आरोग्य सेवा न देणाऱ्या रूग्णालयाने वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. (शहर प्रतिनिधी)
अखेर ‘त्या’ रूग्णांवर झाली शस्त्रक्रिया
By admin | Published: February 07, 2015 12:42 AM