भंडारा : संपूर्ण राज्यात आलेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवून दिला आहे. त्यामुळे जवळचे सख्खे रक्ताचे नातेवाईक असो की स्वतःचा मुलगा, मुलगी, बायको, भाऊ, बहीणही कोरोना संसर्गामुळे मृतांना नाकारू लागल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे.
भंडारा जिल्ह्यात २७ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आजतागायत जिल्ह्यात ८१७ कोरोना मृतांवर गत वर्षभरापासून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यविधीसाठी पुढाकार घेतला आहे. अनेकदा बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचीही जबाबदारी त्यांच्यावरच येत आहेत. काही नातेवाईक कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारालाही येत नसल्याचेही वास्तव आहे. हे सांगतानाही नगरपरिषद कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. अंत्यसंस्काराच्या शेवटच्या क्षणापर्यंत नगरपरिषदेचे कर्मचारी नातेवाईकांची वाट पाहतात, मात्र नाईलाजाने कोणी न आल्यास अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वत:च पार पाडतात. यामध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, अभियंता प्रशांत गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्यसंस्कार केले जात आहेत. यात नियुक्त कर्मचारी सफाई मुकादम रक्षित दहिवले, सफाई कामगार सीताराम बांते, जसपाल सानेकर, संदीप हुमणे, राकेश वासनिक यांच्यासह अन्य रोजंदारी तत्त्वावर काम करणारे कर्मचारी कोरोना मृताच्या कुटुंबीयांना धीर देत अत्यंत जोखमीचे असणारे अंत्यविधीचे काम पार पाडत आहेत. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९,६७३ झाली आहे. आतापर्यंत ३ लाख २९ हजार ५४८ व्यक्तींच्या घशातील स्रावाची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत ३७,७९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी ३४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना मृतांची संख्या एकूण ७१७ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.०८ टक्के आहे. कोरोना मृतांचा आकडा वाढला असतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार. मात्र त्या कर्मचाऱ्यांशीही स्मशानभूमीत काही नातेवाईक हुज्जतबाजी घालत असल्याचेही कटू प्रसंग त्यांनी अनुभवले. येणाऱ्या नातेवाईकांना पीपीई किट घालण्यापासून ते योग्य अंतर राखण्यापर्यंत हेच कर्मचारी मार्गदर्शन करतात. कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या असा सल्लाही देत आहेत. भावुक न होता या कर्मचाऱ्यांना अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
बॉक्स
पाच जणांची परवानगी असली तरी गर्दी टाळण्यासाठी दोघांनाच परवानगी
कोरोना रुग्णाचे निधन झाल्यानंतर त्या मृतांवर भंडारा शहराजवळील गिरोला येथील कोरोना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. यावेळी मृताच्या नातेवाईकांना पीपीई किट घालून उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अंत्यसंस्कारासाठी पाच जणांना शासनाची परवानगी असली तरी अलीकडे भंडारा जिल्ह्यात वाढलेला कोरोना मृतांचा आकडा लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी दोघांनाच परवानगी दिली जाते. कोरोना मृतांचा आकडा वाढल्यापासून अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी पहाटे सहा वाजताच घराबाहेर पडतात. स्वतःचा, कुटुंबीयांचा विचार न करता हे सामाजिक भावनेतून हे कर्तव्य गेल्या वर्षभरापासून ते पार पाडत आहेत. मात्र अनेक नातेवाईक आपल्या घरातील मृताच्या अंत्यसंस्काराकडेही पाठ फिरवत असल्याचे सांगताना कर्मचाऱ्यांना आपले अश्रू अनावर झाले. यावेळी कोरोनाला घाबरू नका, योग्य ती काळजी घ्या, असा सल्ला कर्मचारी देत आहेत.
कोट
कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना चांगले, वाईट दोन्ही अनुभव आले. अखेरच्या क्षणी जवळचे नातेवाईक, स्वतःचा मुलगाही कसा हात झटकतो, हे जवळून पाहता आले. हे चित्र अनुभवताना अनेकदा मला अश्रू अनावर झाले. सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी.
सीताराम बांते, अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी
कोट
कोरोना बाधित मृतांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात शासननियमानुसार माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने अंत्यसंस्कार पार पाडतो आहे. कोरोना मृतांजवळ नातेवाईक यायलाही घाबरतात. मात्र कुणीही घाबरू नये, स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी, एवढेच मी सांगेन.
रक्षित दहिवले, सफाई मुकादम