साकोली : साकोली नगर परिषद वर्षभरापूर्वी अग्निशमन वाहनामुळे चर्चेत आली होती. अनेक वादविवाद झाले. प्रसंगी अध्यक्षांना रजेवर जावे लागले होते. बऱ्याच वादविवादानंतर साकोली नगर परिषदेचे वाहन खरेदीचे प्रकरण शांत होत नाही, तोच आता तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी भाड्याने लावलेल्या वाहनाच्या मुद्दा समोर आला आहे. ४ ऑक्टोबरला मासिक सभेत हा मुद्दा गाजणार असून, अग्निशमन वाहनाचे नंतर पुन्हा साकोली नगर परिषदेत पुन्हा एकदा वाहनाचा मुद्दा चर्चेत येणार आहे
पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या साकोली नगर परिषदेत मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी होत आहे. यात घंटागाडीपासून ते अग्निशमन वाहनापर्यंत खरेदी करण्यात आली. मात्र, अग्निशमन वाहन खरेदीत अध्यक्षांनी नगरसेवकांना विश्वासात न घेता तत्कालीन मुख्याधिकारी परमार यांच्याशी संगनमत करून वाहन खरेदी प्रकरणात मोठा गैरव्यवहार केल्याचा ठपका नगरसेवकांनीच केला होता. त्यावेळी नगराध्यक्ष व नगरसेवक, असे दोन गट निर्माण झाले होते. प्रकरण एवढ्या विकोपाला गेले होते की, अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठीही हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, आमदार डॉ. परिणय फुके यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण सावरण्यात आले होते. मात्र, लगेचच अध्यक्षांची प्रकृती खराब असल्याच्या कारणावरून त्यांनी जवळपास तीन ते चार महिन्यांची रजा घेतली होती. कदाचित अध्यक्षांनी रजा घेण्याची जिल्ह्यातीलच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असावी. अध्यक्षांच्या रजेच्या कार्यकाळात उपाध्यक्ष जगन उइके यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभारी पदभार देण्यात आला. त्याच कार्यकाळात नव्या मुख्याधिकारी म्हणून माधुरी मडावी साकोली नगर परिषद येथे रुजू झाल्या. आल्याआल्याच कोरोनाने थैमान घातले व त्याच वेळेस मुख्याधिकाऱ्यांनी प्रभारी अध्यक्षांच्या काळात खाजगी वाहन नगर परिषद येथे भाड्याने घेतले. हे वाहन जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी होते. तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचे यवतमाळ येथे स्थानांतरण करण्यात आले व साकोली येथे नवे मुख्याधिकारी रुजू झाले. येत्या ४ ऑक्टोबर रोजी नगर परिषदेची मासिक सभा आयोजित करण्यात आली आहे. या मासिक सभेत तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी नगर परिषदेमध्ये चारचाकी वाहन नियमबाह्य पद्धतीने भाड्याने घेतल्याचे दर्शवून झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याबाबतचा विषय या मासिक सभेत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे साकोली नगर परिषदेत आता पुन्हा एकदा अग्निशमन वाहनानंतर तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी लावलेल्या खाजगी वाहनाचा मुद्दा गाजणार आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात लावलेली गाडी नियमानुसार आहे की नियमबाह्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.