भंडारा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल दीड महिन्यापासून बंद असलेली एसटी बस आता रस्त्यावर धावू लागली आहे. भंडारा विभागाने ११० फेऱ्यांचे नियोजन केले असून पहिल्या दिवशी मंगळवारी ५५ फेऱ्यांनी ५४९८ किलोमीटरचा प्रवास करीत महामंडळाला १ लाख १८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. भंडारा - नागपूर बससेवा दर तासाने तर प्रत्येक बसस्थानकातून सकाळी आणि सायंकाळी बससेवा सुरू झाली आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत एसटीचे चाकही १४ एप्रिलपासून थांबले होते. अत्यावश्यक सेवेसाठी बस सुरू होती. परंतु त्याला फारसा प्रतिसाद नव्हता. १ जूनपासून ब्रेक द चेनमध्ये शिथिलता आली. बाजारपेठही काही अंशी सुरू झाली. त्यामुळे नागरिकांचे आवागमन सुरू झाले आहे. अशा स्थितीत एसटी महामंडळाने आपल्या बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. भंडारा विभागातील सहा आगारातून ११० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ६ हजार ७२२ किलोमीटर बसफेऱ्यांचे नियोजन आहे. पहिल्या दिवशी १ जून रोजी ५५ फेऱ्या करण्यात आल्या. त्यात नागपूर आणि इतर ठिकाणच्या बसफेऱ्यांचा समावेश होता. भंडारा बसस्थानकावरुन पवनीसाठी दर अर्ध्या तासाने बससेवा सुरू करण्यात आली आहे तर तुमसर बसस्थानकावरुन नागपूरसाठी दर तासाला बस आहे. साकोली आणि गोंदिया येथूनही नागपूरसाठी बससेवा उपलब्ध आहे. तुमसर-माहूर आणि तिरोडा - अमरावती बसही सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता लवकरच बसेस पूर्ण क्षमतेने धावतील असा विश्वास एसटी महामंडळाला आहे. बसमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांचे नाव, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर लिहून घेतले जात आहे.
बाॅक्स
नागपूरसाठी दर तासाला बस
भंडारा आगारातून नागपूरसाठी दर एक तासाने बससेवा सुरू करण्यात आल्याची माहिती भंडारा विभागाचे मुख्य वाहतूक अधिकारी डाॅ.चंद्रकांत वडस्कर यांनी दिली. तसेच गोंदियावरुन नागपूरला जाणारी बसही भंडारा येथूनच जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध झाली. प्रायोगिक तत्वावर शिवशाही बसही बुधवारी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीनेच प्रवास करावा. कोरोना संसर्गाच्या सर्व नियमांचे पालन करून बसमध्ये प्रवेश करावा. ५० टक्के क्षमतेने बस सुरु करण्यात आली आहे.
- डाॅ.चंद्रकांत वडस्कर, मुख्य वाहतूक अधिकारी, भंडारा विभाग.