रणधुमाळी जि.प. निवडणुकीची : मतदानासाठी केवळ २४ तासांचा अवधी शिल्लक भंडारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. गुरुवारला कुठे पथनाट्य तर कुठे रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्यानंतर उमेदवार मतदारांच्या घरोघरी जावून मतांचा जोगवा मागताना दिसून आले. निवडणुकीसाठी अवघ्या २४ तासांचा अवधी शिल्लक आहे. शुक्रवार, शनिवारची रात्र वैऱ्याची ठरणार आहे.जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी ३१० तर पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी ५३३ असे एकूण ८४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.या उमेदवारांनी जिल्ह्यातील शहरी भाग वगळून सुमारे आठशे गावे पालथी घातली आहेत. शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे मजूर शेतात व्यस्त असल्यामुळे या निवडणुकीत मतदारांमध्ये कमालिचा निरुत्साह दिसून आला. राष्ट्रीय तथा राज्य पातळीवरील नेत्यांची जाहिर सभा यासह क्षेत्राचा विकासनामा सादर करुन मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.दरम्यान, गुरुवारला प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला होता. अपक्ष उमेदवारांनी आपआपल्या तऱ्हेने बिल्ले, हँडबिल वाटप करुन मते मागितली. काही ठिकाणी दुचाकी रॅली काढण्यात आली. सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्यानंतर मतदारांच्या घरोघरी जाऊन मते मागण्यासाठी घोडदौड सुरू झाली. मतदानासाठी २४ तासांचा अवधी शिल्लक आहे. हा अत्यंत महत्वाचा कालावधी असून याच कालावधीत जे काही शक्य आहे, ते केले जाणार आहे. उद्या शनिवारची रात्र वैऱ्याची ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) दोन दिवस राहणार तळीरामांचा घसा कोरडा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी दि. ३ जुलैपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्व देशी व विदेशी दारु दुकान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यातून मार्ग काढण्याकरिता तळीरामांनी आधीच दारूचा स्टॉक करुन ठेवला आहे. मागील आठ दिवसात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात दारुची विक्री झाली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनातजिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी ज्आिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात २५ पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, १,२५० पोलीस कर्मचारी व ४०० गृहरक्षकांचा समावेश राहणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी यापुर्वीच जिल्ह्यातील संवेदनशिल ठिकाणी पोलिसांचा पहारा देत आहेत.
शक्तीप्रदर्शनानंतर थंडावला प्रचार
By admin | Published: July 03, 2015 12:50 AM