भंडारा : तीन दिवसांपासून लाखनी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींचा कळप शुक्रवारी तालुक्यातील बरडकिन्ही जंगलातील फुटका तलावाजवळ मुक्कामी होता. दिवसभर विश्रांती घेऊन २३ हत्तींचा कळप रात्री परिसरातील शेतशिवारात धुमाकूळ घालतो. त्यामुळे हत्ती असलेल्या परिसरातील गावांतील नागरिक रात्रभर जागरण करताना दिसत आहे.
साकोली तालुक्यातून बुधवारी लाखनी वनपरिक्षेत्रात दाखल झालेला हत्तींचा कळप शुक्रवारीही याच परिसरात संचार करीत आहे. बुधवारी रात्री या हत्तींनी गोशाळेत तोडफोड करीत रोपवाटिकेत धुडगूस घातला होता. धानपीकही उद्ध्वस्त केले होते. दिवसभर या हत्तींनी मुक्काम केल्यानंतर रात्री पुन्हा कोहळी रेंगेपार जंगलातून चिचटोला शेतशिवारात धुमाकूळ घातला. शेतकरी फुलचंद बोरकर यांच्या ऊस पिकांचे मोठे नुकसान केले. नवीन लागवड केलेले बेणे तुडवून टाकले. परिसरात रात्रभर धुमाकूळ घालून हा कळप शिवनी येथे पोहोचला. तेथून पुन्हा बरडकिन्ही जंगलात शुक्रवारी पहाटे परत आला. दिवसभर फुकटा तलाव परिसरात या हत्तींचा मुक्काम होता.
भंडारा जिल्ह्यात हत्ती दाखल झाले तेव्हापासून दिवसभर विश्रांती आणि रात्री धुमाकूळ असा प्रकार सुरू आहे. रात्रीच्या वेळी हत्ती शेतशिवारासह जंगलात धुमाकूळ घालताना दिसत आहे. गावात हत्ती शिरू नये म्हणून गावकऱ्यांना रात्र जागावी लागत आहे.
रेंगेपारच्या गावकऱ्यांनी काढली रात्र जागून
तीन दिवसांपासून हत्तींचा कळप रेंगेपार गावाच्या आसपास आहे. गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तिसऱ्या दिवशीही हत्ती गावाच्या दिशेने येत होते. त्यामुळे रेंगेपारवासीयांनी संपूर्ण रात्र जागून काढली. हत्ती पाहण्यासाठी नागरिकांची होत असलेली गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना धावपळ करावी लागत आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात गर्दीला आवर घातला जात आहे.
वनविभागाचा चार दिवसांपासून खडा पहारा
जंगली हत्तींचा कळप भंडारा जिल्ह्यात शिरला तेव्हापासून वनविभागाचा खडा पहारा सुरू आहे. उपवनसंरक्षक राहुल गवई, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे, लाखनीचे वनपरिक्षेत्राधिकारी सुरज गोखले यांच्या मार्गदर्शनात वनकर्मचारी हत्तीवर वाॅच ठेवून आहेत. हत्ती कोणत्या भागात आहेत, कुठे जाणार याचा अंदाज घेत आहे. मात्र हत्ती सातत्याने वनविभागाला हुलकावणी देत धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान नुकसान झालेल्या शेतीपिकांचे सर्वेक्षणही केले जात आहे.