पुस्तकांतून सुगंध दरवळणार : गणवेशांचा गोंधळ, शाळा पदाधिकाऱ्यांचा होणार सन्मान मोहाडी : शाळेचा पहिला दिवस सुखद अन् स्मरणात राहणारा असतो. आज सकाळपासून शाळेत विद्यार्थ्यांची किलबिलाट सुरु होईल. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाईल. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. किलबिलणारी मुलं अन् त्यांच्या हातात असणाऱ्या नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध शाळाभर पसणार आहे.शैक्षणिक सत्र २०१६-१७ चा पहिला दिवस सोमवार २७ जून रोजी सुरु होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्या मस्तीत घालविणारी ही मुले आज शाळेत पाय ठेवणार आहेत. शाळेस येण्यास आसुसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सजविण्यात आल्या आहेत. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना पुष्प देवून त्याचे स्वागत करण्यात येणार आहे. रांगोळ्यांनी प्रवेशद्वार सजणार आहे. शाळेतून प्रवेश दिंडीही काढण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थी उपस्थित राहावे यासाठी शिक्षकांच्या पालकगृहभेटी झाल्या आहेत. आता प्रतिक्षा आहे सकाळ उजाडण्याची.पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या शाळांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहेत. आता ती नवी कोरी पुस्तके विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करीत आहेत. शिक्षक पालक संघ, शाळा व्यवस्थापन संघाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मान देवून त्यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मुलांना नवी शाळा, नवीन मित, नवीन शिक्षक सगळे काही नवे असणार आहे. गणवेशांचा गोंधळसर्व शिक्षा अभियान योजनेतून लाभधारक विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश दिला जाणार असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शाळेच्या आदल्या दिवशी शाळांमार्फत गणवेशाचे वाटप करण्यात यावे अशा मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या होत्या. पण, जिल्हा परिषदेच्या शाळांना पैसाच पोहोचला नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांना गणवेशाचे कापड खरेदी करता आले नाही. शिक्षण विभागाकडून माहिती घेतली असता मोहाडी पंचायत समितीने गणवेशाची ४१ लक्ष ८९ हजार रुपये एवढी रक्कम बँकेत १० जून रोजी जमा केली. तथापि, बँकेच्या व्यवस्थापकांनी विविध कारणे पुढे करून मुख्याध्यापकांच्या बँक खाते क्रमांकावर पैसा पोहचता केला नाही. बँकेच्या टाळाटाळने मुख्याध्यापकांना गणवेशाचा पैसा बँकेतून उचलता आला नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांनी आपल्या प्रतिष्ठेवर दुकानातून कापडांची खरेदी केली. उशिरा गणवेश शिवायला दिले. त्यामुळे बहुतांश शाळेत गणवेशच शिवून पोहोचले नाही. त्यामुळे आदल्या दिवशी मुख्याध्यापकांनी गणवेशाचे वाटप केले नाही. काही मुख्याध्यापाकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून उधारीवर कपडे खरेदी करून गणवेष शिवून घेतले आहेत. शाळेच्या प्रथम दिवशी काही शाळांमध्ये गणवेशाचे वाटप केले जाणार आहे. शाळा सकाळी ७.३० वाजता सुरु होईल. पुस्तकांचे वाटप, प्रवेश दिंडी, विद्यार्थ्यांचे स्वागत आदी कार्यक्रम १०.३० पर्यंत करायचे आहेत. त्यानंतर दिवसभर विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केंद्र प्रमुखांमार्फत मुख्याध्यापक यांना दिल्या आहेत. त्यामुळे सकाळी येणारा विद्यार्थी पाच वाजता घरी जाईल. १ ते आठवी पर्यंत शालेय पोषण आहार दिला जातो. त्यामुळे १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जेवण मिळेल. मग ९ वी १० वी चे विद्यार्थी सकाळपासून उपाशी राहणार आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची पळापळी होणार आहे. शिक्षण विभागाकडून पहिल्या दिवशीचे वेगळे नियोजन करण्यात आले आहे. शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती यांना प्रत्येकी तीन चार शाळेत जावून शाळेत पहिल्या दिवशी आहार शिजविला काय? विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप झाले काय? गणवेष दिले गेले काय? तसेच शाळेतील पहिल्या दिवसाची पटसंख्या किती याबाबत माहिती प्रत्यक्ष द्यायची आहे. (तालुका प्रतिनिधी/प्रतिनिधी)शाळेच्या पहिल्याच दिवसाचा आढावा घेण्याचा भंडारा पं.स.चा निर्णय भंडारा : २७ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरु होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण शाळांना भेट, शैक्षणिक वर्षाचे नियोजन आणि शालेय पुस्तक व गणवेश आढावा घेण्याचा महत्वाकांक्षी निर्णय पंचायत समीती भंडारा अंतर्गत शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी शाळा, केंद्र व विभागस्तरावर बैठक घेवून कार्यक्रमाची अंमलबजावणी संदर्भात सर्व तयारी करण्यात आली आहे.गटशिक्षणाधिकारी भंडारा शामकर्ण तिडके, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड, विनोद चरपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समीती भंडारा अंतर्गत पर्यवेक्षक अधिकाऱ्यांची सभा घेण्यात आली. यावेळी विस्तार अधिकारी कविता पाटील, खिलोतमा टेंभूरकर, मनिषा गजभिये, व भंडारा विभागातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थितीत होते. २७ जून रोजी भंडारा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या सर्व शाळांना अधिकाऱ्यांच्या भेटीचे नियोजन ठरवून देण्यात आले. यात शालेयस्तरावर शिक्षणाबद्दल जागृती करून शालेय गणवेश, पुस्तका देण्यात येणार आहे. तालुक्यातील इयत्ता १ ते ८ च्या सर्व पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकारी श्यामकर्ण तिडके यांनी दिले आहे.पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या नवागतांचे पुष्प देवून स्वागत होणार असून शालेय पोषण आहारात गोड पदार्थ वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिवहन समिती व शैक्षणिक प्रगती घेवून त्यांचे योग्य मुल्यांकन व्हावे, यासाठी शाळास्तरावर विविध समित्या स्थापन करून कारवाई करण्याचे ठरविण्यात आले.१ जुलै रोजी तालुक्यातील प्रत्येक शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व गावातील सार्वजनिक ठिकाणात वृक्ष लागवडीच्या दृष्टीने शोलय विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पूर्वतयारी त्याबरोबर नियोजनाचा आढावा घेण्यात येणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या संबधाने शासन निर्णयाचे वाचन व अध्ययन पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आहे. वरीष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड यांनी पहिल्या दिवसापासून होणारे कार्यक्रम आणि नियोजन यावर माहिती सागंून गुणवत्ता वाढीसाठी ज्ञानरचनावादी पद्धतीचा अवलंब करण्यासंदर्भात सखोल माहिती दिली. तालुक्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांना भेटीचे नियोजन आणि विभागावर जबाबदारी व कार्य करण्याची पद्धत गटशिक्षणाधिकारी शामकर्ण तिडके यांनी सांगितले. प्रास्ताविक वरीष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड व आभार खिलोत्तमा टेंभुरकर यांनी मानले. १ एप्रिल रोजी प्रवेशोत्सव साजरा करायचा होता. केवळ मोहगाव / देवी केंद्राने प्रवेशोत्सव साजरा केला. उन्हाळ्यात नवी प्रवेशित विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यात आले.बदल्यांमुळे गोंधळ झाला. काही प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक बदलीने दुसऱ्या शाळेत गेले. कार्यभार कनिष्ठ शिक्षकांकडे दिला नाही. गणवेष खरेदी संबंधी प्रश्न निर्माण झाला.शाळेच्या पहिल्या दिवशीचे नियोजन शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. मुख्याध्यापकांनी वृक्षारोपणापूर्वी तयारी करून ठेवावी. पहिल्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात यावे.- रमेश गाढवेगटशिक्षणाधिकारीपंचायत समिती, मोहाडी.
उन्हाळ्याच्या सुटीनंतर आजपासून शाळेत किलबिलाट सुरु
By admin | Published: June 27, 2016 12:41 AM