लाखांदूर : बाघ इटियाडोह धरणांतर्गत सिंचन सुविधा उपलब्ध होतांना तब्बल १५ वर्षापासून अंकेक्षणाअभावी शासनाकडे थकीत असलेला पाणसाराचा परतावा तब्बल दहा वर्षांनंतर मिळाला आहे. यासाठी लाखांदूर येथील साईबाबा पाणीवापर संस्थेने महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याने शेतकरी जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.
बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत लाखांदूर तालुक्यात जवळपास १४ पाणीवापर संस्था कार्यरत आहेत. या संस्थांतर्गत नियमित कृषी सिंचन सुविधा उपलब्ध होताना पाणसारा वसूल केला जातो. सदर पाणसाऱ्याअंतर्गत काही टक्के रक्कम जिल्हा परिषद निधीत तर काही टक्के दंडाची रक्कम वगळता मूळ पाणसारा रकमेच्या प्रत्येकी २५ टक्के रक्कम पाणीवापर संस्थेला दोन टप्प्यात दिली जाते. सदर रकमेतून पाणीवापर संस्थेअंतर्गत वितरिका व लघु कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. पाटचारे स्वच्छताविषयक कामे शेतकऱ्यांकडून स्वयंस्फूर्तीने केली जात आहेत.
दरम्यान, स्थानिक लाखांदूर येथील साईबाबा पाणीवापर संस्थेंतर्गत गत १५ वर्षापासून संस्थेचे अंकेक्षण न झाल्याने पाणसारा कमी अधिक प्रमाणात भरणा करूनही शासनाकडे परतावा थकीत असल्याने या संस्थेला देखभाल दुरुस्तीसह अन्य कृषी सिंचन सुविधा उपलब्ध करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. सदर प्रकरणी येथील विद्यमान पाणीवापर संस्थेने दखल व पुढाकार घेत १५ वर्षांपासून रखडलेले संस्थेचे अंकक्षण करून घेतल्याने या संस्थेला तब्बल दहा वर्षानंतर पाणसारा परतावा म्हणून तीन लक्ष ५५ हजाराचा निधी शासनाने उपलब्ध करुन दिला आहे. सदर अंकेक्षण होताना शासनाने कोणतेही आक्षेप न नोंदविल्याने गत १५ वर्षात या संस्थेन्तर्गत गैरव्यवहार न झाल्याचे निष्पन्न झाले. संस्थेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.