भंडारा : तालुक्यातील गुंथारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने एक शिक्षक देण्यात यावा, तसेच वर्गखोली मंजूर करण्यात यावी, या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी शाळेला कुलूप ठोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत जि. प. सदस्य अस्मिता गंगाधर डोंगरे, शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी शाळेत लवकरच शिक्षक नियुक्तीचे आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी आंदोलनाची रितसर सांगता झाली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंथारा येथे वर्ग १ ते ४ असून विद्यार्थी पटसंख्या ९८ आहे; परंतु शाळेत एका वर्गासाठी शिक्षक नाही. त्यामुळे विद्यार्थी अध्ययन व अध्यापन कार्यापासून दिवसभर वंचित असतात. तसेच शाळेतील वर्गखोलीची रचना षटकोनी असून एका वर्गात २५ पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे एकाच वर्गखोलीत दोन वर्ग बसविणे शक्य नाही, गत दोन वर्षांपासून या शाळेतील विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय पाचगाव येथे निवड होत आहे; परंतु सद्यःस्थितीत एक शिक्षक नसल्यामुळे गरीब होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेची समस्या सोडविण्यासंबंधीचे निवेदने अधिकारी व पदाधिकाऱ्यांना देऊनही टाळाटाळ होत असल्याने बुधवारी सकाळी १० वाजतापासून सरपंच रमेश चावरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भारत गोमासे व पंचायत समितीचे माजी सदस्य गुड्डू सार्वे यांच्या नेतृत्वात शाळेच्या प्रवेशव्दारासमोर आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी विनायक वंजारी, गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड, जिल्हा परीषद सदस्य अस्मिता गंगाधर डोंगरे, पंचायत समिती सदस्य कांचन होमदास वरठे, जिल्हा परीषद माजी सदस्य राजू सयाम, निलकंठ कायते यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती."विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पाहता शाळेला लवकरच एका शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. शाळेच्या विकासासाठी आपण कटीबध्द आहे."-रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
"गुंथारा येथील जिल्हा परीषद शाळेला शिक्षक देण्यात यावे, यासाठी नियमित पाठपुरावा करण्यात आला. शिक्षण विभागाकडून जर शिक्षक देण्यास कुचराई होत असल्यास शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावातील एका डीएड शिक्षित बेरोजगारधारकास नियुक्त करावे, त्यांना महिन्याकाठी स्वत: पाच ते दहा हजार रुपये मानधन देईन."-अस्मिता गंगाधर डोंगरे, जिल्हा परीषद सदस्य.