भंडारा : अत्याचार झाल्यावर ती मूर्च्छितावस्थेत अर्धनग्न अवस्थेत पडून राहिली. चार-दोन तास नव्हे, तर तब्बल ४० तासांच्या जवळपास ती झुडुपात निपचित पडून होती. शुक्रवारी मध्यरात्रीपासून तर रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत एकाच ठिकाणी पडून असलेल्या ‘तिला’ अखेर पोलिसांनी रुग्णालयात नेले. ना बोलण्याची शुद्ध, ना काही सांगण्याची मनस्थिती! गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर धागा गवसला, आरोपी सापडला. अत्याचारानंतर तब्बल पाच दिवसांनी बुधवारी रात्री पोलिसांनी अत्याचारी नराधम ऑटोचालकाच्या मुसक्या आवळल्या.
बसुराज पंढरी नंदेश्वर असे या ५७ वर्षीय ऑटोचालकाचे नाव आहे. शहरातच राहणारा हा ऑटोचालक गणेशपूर परिसरात ऑटो चालविण्याचा व्यवसाय करतो. शुक्रवारी सायंकाळी आपल्या ऑटोतून (क्र. एमएच- ३६, एच- ४९७७) पीडितेला ऑटोत बसवून तो वस्तीपलीकडे घेऊन गेला. अत्याचार केल्यानंतर तिला तसेच सोडून रात्री १२:३० वाजता तो ऑटोने साळसूदपणे निघून आला. शुक्रवारी रात्रीपासून निपचित पडलेली ती महिला रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नागरिकांच्या दृष्टिपथास पडल्यावर पोलिसांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या काळात जवळपास ४० तास ती अन्नपाण्यावाचून अर्धनग्न अवस्थेत पडून होती.
बसुराज आहे विवाहित
पाशवीपणाची परिसीमा गाठलेला आरोपी बसुराज नंदेश्वर विवाहित असून, त्याला चार मुले आहेत. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नाही. गणेशपूर चौकातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये शुक्रवारी सायंकाळी त्याचा ऑटो जाताना आणि रात्री १२:३० वाजता येताना दिसला. हा संशयाचा धागा महत्त्वाचा ठरला. अन्य प्रत्यक्षदर्शींच्या पुराव्यावरून त्याच्याविरुद्ध कलम ३६७ (२) (जे), ३६७ (२) (आय), ३५४ (बी), २०१ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ६ मेपर्यंत त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.